लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची महामारी आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. यामध्ये अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा निर्बंध तो म्हणजे दहा हजार रुपये दंड. लाॅकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना तब्बल दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. हा दंड ऐकूनच अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, दोन दिवसांत पोलिसांनी एकाही व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड केला नाही. त्याचे कारण म्हणजे पोलीस सहानुभूतीने विचार करीत आहेत. जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली जाहीर केली. या नियमावलीमध्ये पहिल्यांदाच दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एरवी दोनशे ते पाचशे रुपये दंड जाहीर करण्यात आला होता. मात्र, ही रक्कमही मोठी असल्याने अनेकांकडून शंभर रुपये दंड घेतला जात होता. गतवर्षी सुरुवातीच्या कोरोनाच्या महामारीमध्ये पाचशे रुपये दंड काही दिवस आकारला गेला. मात्र, प्रशासनाने हा निर्णय लेखी मागे न घेता अधिकाऱ्यांना तोंडी सूचना देऊन पाचशे रुपये दंड घेऊ नका, १०० ते २०० रुपये दंड आकारा, अशा सूचना दिल्या. आता तर दहा हजार रुपये दंड जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या दहा हजार रुपये दंडाचा जिल्ह्यात पहिला मानकरी कोण होतोय, याची उत्सुकता आता नागरिकांना लागून राहिली आहे. सध्या कडक लाॅकडाऊन असला तरी अनेकजण अत्यावश्यक सेवेचे कारण सांगून घराबाहेर पडत आहेत. काहींचे हॉस्पिटलचे कारण असते. त्यामुळे पोलीस अशा व्यक्तीवर दोनशे रुपये दंड आकारून त्यांना समज देत आहेत. हा दहा हजार रुपयांचा दंड सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे लोक पिचलेले आहेत. आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्यासुद्धा गेल्या आहेत, याचा विचार पोलिसांकडून सध्या केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
चौकट:
पोलीस देताहेत नियम पाळण्याचे संदेश
सध्या कडक लॉकडाऊन असला तरी पोलिसांकडून गुन्हे दाखल करून नियम पाळण्याचा संदेश दिला जात आहे. दहा हजार रुपये दंड करणे हे अन्यायकारक ठरेल, असे पोलीस खासगीमध्ये बोलून दाखवत आहेत. नागरिकांना एवढ्या मोठ्या रकमेचा दंड परवडणारा नाही, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.