लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली असून, यामध्ये खटाव तालुक्यातील अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून, विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे ‘आमचं ठरलयं..’ का नेमके कोणाचे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या खटाव तालुक्यातील तीन संचालक प्रतिनिधित्व करीत आहेत. यामध्ये सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार प्रभाकर घार्गे, भटक्या विमुक्त प्रवर्गातून अर्जून खाडे, इतर मागास प्रवर्गातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते आहेत. सलग तीनवेळा हॅटट्रिक मारून प्रभाकर घार्गे चौकार मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पक्षांतर्गत व विरोधी अनेक नेते त्यांना थांबविण्यासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत, तर प्रभाकर घार्गे यांनीही पूर्ण ताकद लावत मी पुन्हा येईन म्हणत शड्डू ठोकला आहे.
दुसरीकडे काँग्रेसला खटाव-माण तालुक्यात संजीवनी देणारे व कार्यकर्त्यांच्यात जोश भरणारे हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनीही दंड थोपटले आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर निमसोडसह अनेक ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत, तर लगेच जिल्हा बँक निवडणूक लागल्याने पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्याची चुणूक दाखविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर त्यांच्याच गावातील प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरेही इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी औंधला साकडे घातल्याचेही बोलले जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे देशमुख आणि मोरे या दोघांचेही संबंध जवळचे असल्याने त्यांचा वरदहस्त कोणाला मिळणार? यावरही अनेक समीकरणे अवलंबून आहेत.
आ. जयकुमार गोरे यांनीही तालुक्यात पूर्ण लक्ष घातले असून, ते भाजप तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांना आखाड्यात उतरवून विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या त्रासाचा वचपा काढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, यामध्ये सरळ लढत होणार का, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.
(चौकट)
यांची भूमिका ठरणार महत्त्वपूर्ण...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वर्धनचे अध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.
फोटो (आयकार्ड फोटो वापरणे)
१) जयकुमार गोरे
२) प्रभाकर घार्गे
३) रणजितसिंह देशमुख
४) गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी