जगदीश कोष्टी
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यातून रेल्वे एक्स्प्रेस थांबत असल्या, तरी त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना म्हणावा तेवढा फायदा होत नाही. त्यामुळे पॅसेंजर कधी सुरू होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अजूनही पॅसेंजर सुरू केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे मंत्रालयाने दोन डोस घेतलेल्यांना एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यास मुभा देण्याची गरज आहे.
एक्स्प्रेस सुरूच
सातारा जिल्ह्यातून धावत असलेल्या एक्स्प्रेस गाड्या अनेक ठिकाणी थांबत असतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. पॅसेंजरबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
- एक अधिकारी.
चौकट
चार पॅसेंजर सुरू केवळ रेल्वे कामगारांसाठी...
सातारा जिल्ह्यातून धावत असलेल्या कोल्हापूर-पुणे, सातारा-पुणे या गाड्या रात्री फिरत असायच्या. दरम्यानच्या काळात फलटण-पुणे या डेमू पॅसेंजर दिवसातून दोनवेळा धावत होती. त्या आता बंद आहेत. या पॅसेंजर सुरू आहेत. मात्र त्यामधून रेल्वे कामगारांनाच प्रवास करू दिला जात असतो. इतरांना बंदी आहे.
चौकट
रोज चार एक्स्प्रेस सुरू
सातारकरांसाठी सध्या दररोज धावणारी निझामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर छत्रपती शिवाजी टर्मिनस स्पेशल ट्रेन धावते. दर रविवारी गांधीधाम एक्स्प्रेस, दादर सेंट्रल स्पे., तर दर मंगळवार, शुक्रवार, शनिवारी दादर सेंट्रल चालुक्य एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र यांना जिल्ह्यात मोजकाच थांबा देण्यात आला आहे.
चौकट
महालक्ष्मी, सह्याद्री बंदच
पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सोयीच्या असणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे दुहेरीकरणामुळे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
चौकट
शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मोठी गरज
सातारा जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक पुण्याला कृषी माल घेऊन पॅसेंजरने जात असतात. स्वतंत्र गाडी करून माल घेऊन जाणे सर्वच शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे पॅसेंजर फायद्याची आहे. यामुळे रेल्वेलाही चांगले उत्पन्न मिळत असते. त्यामुळे पॅसेंजर सुरू करावी.
- प्रमोद जेधे, प्रवासी, सातारा.
रेल्वे प्रशासनाने मुंबईत दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातून शेतकरी, महाविद्यालयीन तरुणांना कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी पॅसेंजर सुरू करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यादृष्टीने विचार करायला हवा.
- राहुल उतेकर, सातारा