कऱ्हाड : पंतप्रधानांनी काश्मीरमधील ३७० चे कलम रद्द करण्याची हिंमत दाखविली. त्यानंतर उदयनराजेंसारख्या अनेक स्वाभिमानी नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजेंच्या प्रवेशानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी हा तर लोकशाहीचा खून केला, अशी टीका केली. चव्हाणांनीही अगोदर ३७० च्या बाजूने की विरोधात, तिरंग्याच्या बाजूने की विरोधात? याचा खुलासा करावा, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.कऱ्हाड येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अॅड. भरत पाटील, एकनाथ बागडी आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ७० वर्षांनंतर एखादा पक्ष किंवा नेता काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतो आणि अशावेळेला काँगे्रस-राष्ट्रवादीचे नेते ३७० कलमाच्या बाजूने बोलणार असतील, तर ही बाब देशहिताची नाही.पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती या सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र, ७००-८०० टक्के पडणारा पाऊस पाहिल्यानंतर भविष्यातील याचे नियोजन करण्यासाठी जागतिक बँकेकडे संपर्कसाधला आहे.
डिजास्टर प्रूफ इन्फ्रास्ट्रक्चर करता येईल का? हेही पाहणार आहे. त्याशिवाय धरणाच्या सांडव्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे कसे वळविता येईल, याबाबतही अभ्यास सुरू असून, ते पाणी दुष्काळी भागाकडे वळविल्याने पाणी वाटपाच्या लवादाचा प्रश्नच येत नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.उदयनराजे मुक्त विद्यापीठउदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करताना कॉलर उडवली नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना शिस्त लागत आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत छेडले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. कुठं शिस्तीत वागायचं अन् कुठं मुक्त वागायचं, हे त्यांना चांगलं कळतं, असे ते म्हणाले. त्यावर तुम्ही त्यांना संघाच्या नियमानुसार शपथ घ्यायला लावणार काय? असा प्रश्न विचारताच त्यांना काय अडचण नाही, तुम्हाला काय अडचण आहे का? असा सवाल त्यांनी केला.पवारांचे वक्तव्य बरोबर नाहीभारतामधील मुसलमान देशाचा अभिमान बाळगणारे आहेत. पाकिस्तानचं कौतुक करून इथला मुसलमान राष्ट्रवादीला मते देणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी आपल्या वक्तव्याचा पाकिस्तानला उपयोग होईल, अशी विधाने करणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.