सातारा : कडक लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सातारा मोठ्या प्रमाणावर अनलॉक झाला आहे. पापी पेट का सवाल म्हणत गल्लीबोळात हातगाड्यांवर दुकाने थाटून पुन्हा एकदा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मास्कशिवाय खरेदी करणारे ग्राहक, सोशल डिस्टन्सिंग न पाळता दुकानात गर्दी करणारे, असे चित्र दिसू लागल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अन्य महानगरांच्या तुलनेत साताऱ्याचा आकडा कायम वरचा राहिला आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर साताऱ्यात विरळ वसाहत आहे. अनेक मोकळ्या जागा, प्रशस्त घर, बाहेर वावरायला सार्वजनिक ठिकाणं असल्याने साताऱ्यात याचा प्रसार इतक्या वेगाने होणे अपेक्षितच नव्हते. पण आपल्याला काही होणार नाही, ही भावना आणि आजार अंगावर काढण्याच्या वृत्तीमुळे हे आकडे शंभर, दोनशे करत अगदी अडीच हजारांवरही पोहोचले.
जिल्ह्यात कोविडची व्याप्ती वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे आदेश काढले. दुकाने पुढून बंद मागून सुरू, असे चित्र अवघ्या बाजारपेठेत पाहायला मिळाले. याची माहिती मिळूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला. सताड उघडं ठेवलं तर सोशल डिस्टन्सिंग होत नाही आणि चोरून द्यायचं म्हटलं की गर्दी होऊ देत नाहीत, हे प्रशासनाने बरोबर हेरले होते. कडक लॉकडाऊनमध्ये अनेकांचे साजरीकरण आणि खाण्याचे मूड समाजमाध्यमांवरही झळकले. या दिवसांत मिळणारे साहित्य चढ्या दराने घेणाऱ्यांची संख्या वाढली पण सुरक्षित अंतर ठेवून खरेदी केल्याने संसर्ग टाळला गेला.
चौकट :
१.
गेला की कोरोना आता कशाला मास्क!
सातारा जिल्ह्याचा कोविडचा आकडा वाढता असल्याने प्रशासनाच्यावतीने गेले पंधरा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यात शिथिलता आणल्यानंतर कोविड संपलाय, असा समज करून अनेकजण विनामास्क घराबाहेर पडत आहेत. पोलीस दिसले की हनुवटीचा मास्क वर ओढणाऱ्या या दिग्गजांना ‘अनलॉक केलं म्हणजे कोरोना गेला’ असंच वाटू लागलं आहे.
२.
पंधरा दिवस राहिलो की डांबून घरातच!
सुसाट गाड्या आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तरूणांवर लगाम ठेवणं आवश्यक बनलं आहे. कोविडचे सायलंट कॅरिअर म्हणून फिरणारी ही तरूणाई अनेकांसाठी धोकादायक ठरू शकते. उगीचच बाहेर का पडताय, या प्रश्नावर ही तरूणाई ‘पंधरा दिवस काढले की घरातच डांबून’ हे ठरलेलं उत्तर देत आहे.
३.
मंडई बंद मग मुख्य रस्त्यात पथारी!
प्रशासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असली, तरीही भाजी मंडई सुरू करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अनेकांनी भाजी आणून ती गल्लीतील मुख्य रस्त्यावर विकायला सुरू केली आहे. रिक्षाचालक, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांसह हंगामी काम करणाऱ्या अनेकांनी भाजी विकण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
कोट :
सलग दीड वर्ष कोविडची परिस्थिती असल्याने अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बदलले आहेत. यात प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेत येणारे उद्योग निवडले आहेत. कुटुंबाच्या खर्चासाठी व्यवसाय सुरू करणाऱ्यांनी यातून कुटुंबाला कोविड होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
- कन्हैय्यालाल राजपुरोहित, सातारा
\\\\\\