खटाव : आम्हाला बघून गाडीचा हॉर्न मुद्दाम वाजवलास म्हणून चिडून खटावमधील प्रशांत नंदकुमार घाडगे यांना किटली, खोरे व झारीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील एसटी स्टँड परिसरात घडली. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.
गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या बहिणीला आणण्यासाठी मित्रासमवेत गेला असताना आम्हाला बघून गाडीचा हॉर्न का वाजवला? असे म्हणत खटावमधील अक्षय दिलीप पाटोळे, किशोर दिलीप पाटोळे व विजय रघुनाथ फडतरे यांनी शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. ‘ शिव्या का देता शिव्या देऊ नका,’ असे म्हणताच स्टँडवर असलेल्या वडापावच्या गाड्यावर असलेली किटली घेऊन डोक्यात मारली तर जवळच असलेल्या खोऱ्याने डाव्या हाताच्या मनगटावर मारल्यामुळे डावा हात निकामी झाला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर भोसले करत आहेत.