सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जुनी इमारत, मुख्य प्रशासकीय इमारत, नियोजन भवन असून, जागा अपुरी पडत असल्याने आणखी एक इमारत उभी राहत आहे. सुमारे ६५ एकरावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार आहे. यात इमारतींची संख्या आणि कोट्यवधींचा खर्च वाढवण्यापेक्षा एकच सहा मोठी इमारत बांधून खर्च वाचवता आला असता, अशी अपेक्षा आता सातारकरांतून व्यक्त होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीत सध्या पुरवठा विभाग आणि नगर प्रशासन विभागाचे काम सुरू आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीला आणखी एक मजला वाढवल्यामुळे रोजगार हमी, पुनर्वसन, करमणूक स्थलांतरित केली आहेत. तत्पूर्वी याठिकाणी जिल्हाधिकारी यांचे दालन, गृह शाखा, निवडणूक शाखा, संजय गांधी योजना कार्यालय, लेखा विभाग, राजशिष्टाचार विभाग, निवडणूक शाखा, महसूल, अपर जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांची दालने, कूळ कायदा शाखा, आपत्ती व्यवस्थापन, आस्थापना आदी विभाग सुरू आहेतच. नियोजन विभागाच्या तिसऱ्या मजल्यावर गौण खनिजाचे काम सुरू आहे.ग्रामपंचायत शाखा कॅन्टिनशेजारील कौलारू घरात आणि एनआयसी शाखा वेगळ्या छोट्या इमारतीत सुरू आहे. याशिवाय ग्राहक न्यायालयाच्या शेजारी सध्या सर्व भूसंपादन विभागाची कार्यालये आहेत. हे सर्व विभाग एकाच इमारतीत केले असते तर ठिकठिकाणच्या इमारतींमुळे जागा अडून राहिली नसती आणि कोट्यवधी रुपयांच्या खर्चात थोडी काटकसरही करता आली असती.
दुसऱ्या नियोजन भवनाचा घाटसध्या एक नियोजन भवन वापरात आहे. तरीही पुन्हा नियोजन भवन बांधले जात आहे, ज्याची प्रस्तावित अंदाजे रक्कम ८ कोटी ८९ लाख ४२ हजार ८०४ होती. हा खर्च १५ कोटीपर्यंत जाऊ शकतो. जागा अपुरी पडेल तसतशी इमारतींची संख्या वाढवण्यापेक्षा प्रशासनाने दूरदृष्टी ठेवून टोलेजंग इमारत बांधल्यास खर्च वाचू शकतो. सातारा पालिका नऊ मजली इमारत उभारत असेल तर जिल्हा प्रशासनाला हे का शक्य हाेत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.