सातारा : गाेडोलीतील साईबाबा मंदिर ते कल्याणी शाळा या मार्गावर पालिकेच्या वतीने डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून काही धेंडांचे अतिक्रमण न हटविताच हे काम केले जात असल्याचा आरोप गोडोलीतील नागरिकांनी केला आहे. एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम न लावता रस्त्याकडील अतिक्रमणे हटवून संपूर्ण रस्ता १२ मीटर रुंदीचा व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बांधकाम विभागाच्या नोंदीनुसार गोडोलीत १२ मीटर रुंदीचा रस्ता केला जात आहे. या रस्त्याआड येणारी अतिक्रमणे हटविली जात आहेत. काही नागरिकांनी रस्ता रुंद व्हावा यासाठी स्वत:हून पुढाकार घेत जागा मोकळी करून दिली आहे. असे असताना एका फॅब्रिकेशन व्यवसायासमोरील रस्त्याची रुंदी १०.९० मीटर इतकीच भरत आहे. ही बाब तांत्रिकदृष्ट्या न पटणारी आहे. याबाबत तक्रारी करूनही याचा काहीच उपयोग झालेला नाही. संबंधित अतिक्रमणावर कारवाई न करता येथे गटार व डांबरीकरणाचे काम केल्यास ते बंद पाडले जाईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला प्रशासनच जबाबदार असेल. रस्त्याचे काम हे नियमाप्रमाणेच व्हायला हवे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
संपूर्ण रस्ता जर १२ मीटर रुंदीचा होत असेल तर एकाच ठिकाणी त्याची रुंदी कमी का? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पालिकेने डांबरीकरणाचे काम जरूर करावे, मात्र, भविष्याचा विचार करून अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करावा. - ॲड. वैभव मोरे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस