सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण पुन्हा एकदा सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) पडल्याने पाठीमागील दावेदार मानसिंगराव जगदाळे यांना यावेळीतरी नशीब साथ देणार का ? का परत संजीवराजेंनाच लॉटरी लागणार, याकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष आहे. त्यातच आताच्या आरक्षणामुळे अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असलेतरी निवडीचा निर्णय हा शेवटी बारामतीवरूनच होईल, असेच संकेत मिळत आहेत.
जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या ६४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळविले. सद्य:स्थिती पाहिली तर राष्ट्रवादीकडे ४० सदस्य आहेत. तर काँग्रेसचे ७, भाजप ६, शिवसेना ३, सातारा विकास आघाडी ३, कºहाड विकास आघाडी ३ आणि पाटण विकास आघाडी १ असं बलाबल राहिलंय. भाजपचे सदस्य राहिलेले दीपक पवार यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त राहिले आहे. त्यासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
निवडणुकीनंतर पहिल्या अडीच वर्षांसाठी आरक्षण हे सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) साठी आरक्षित होते. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष असणारे संजीवराजे नाईक-निंबाळकर, कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मानसिंगराव जगदाळे व सध्याचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे दावेदार होते; पण यात संजीवराजे आणि जगदाळेंचेच पारडे जड होते. शेवटी संजीवराजेंनाच अध्यक्षपदाची लॉटरी लागली. आताही पुन्हा एकदा अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारणसाठी पडले आहे. त्यामुळे बहुमत असणाºया राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक आहेत.
विद्यमान अध्यक्ष संजीवराजेंनाच पुन्हा संधी मिळेल, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. कारण, गेल्या अडीच वर्षांत संजीवराजेंनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक होईल, असेच काम करून दाखविलं आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते; पण एका व्यक्तीलाच पुन्हा संधी नको म्हणून कदाचित त्यांचा विचार होणार नाही. तर मागील दावेदार मानसिंगराव जगदाळे यांच्यासाठी नशिबाने पुन्हा एकदा दार ठोठावलं आहे. यावेळी आरक्षण दुसरे काही पडले असते तर जगदाळेंना नक्कीच उपाध्यक्षपद मिळणार होते; पण सर्वसाधारण आरक्षणाने जगदाळेंसाठी अध्यक्षपद खुणावू लागलं आहे. त्यांच्यासाठी आमदार बाळासाहेब पाटीलही जोरदार प्रयत्न करू शकतात. त्यामुळे मागे संधी हुकली म्हणून पक्षश्रेष्ठीही निष्ठावंत राहिलेल्या जगदाळेंची वर्णी अध्यक्षपदावर लावू शकतात, असेच चित्र आहे.