सातारा : राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा करून माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील जनता जागृत आहे. मंदिरे उघडल्यानंतर तिथे गर्दी होणार नाही. देशापेक्षा महाराष्ट्र राज्य वेगळं नाही, हे सगळ्याच धर्मीयांचं म्हणणं आहे. जनतेची भावना लक्षात घेऊन सरकारने तत्काळ मंदिरे उघडी करावीत.काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकातील मनगुट्टी गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी फडणविसांनी आग्रह धरण्याची मागणी केली होती, त्याबाबत छेडले असता फडणवीस म्हणाले, मुश्रीफांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्याने जे होणार नाही, ते आम्ही करून दाखवू हे त्यांना माहीत आहे.
मनगट्टी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केला. हे आमदार कर्नाटकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगण्याऐवजी मुश्रीफ आपल्या सहकारी पक्षाला का सांगत नाहीत. मी तर नक्कीच सांगेन आणि महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी जिथे गरज असेल तिथे आंदोलन करेन. मात्र, या प्रकरणात कोणीही विनाकारण राजकारण करू नये.अलमट्टीची उंची ही पूर्वीच्या राज्यकर्त्यांची चूकअलमट्टीची उंची महाराष्ट्राला मान्य नाही. तरी देखील या धरणाची उंची आता वाढू शकत नाही. मात्र, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या धरणाच्या उंचीबाबत आक्षेप घ्यायला पाहिजे होता, तो घेतला नाही, ती त्यांची चूक होती. आता काहीही होऊ शकत नाही, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.