विद्यानगर 23 : विद्यानगरीतील नागरीक सद्या एका वेगळ्याच समस्येने त्रस्त झाले आहेत. अनेक नागरीकांनी सध्या आपल्या सोसायटीत तसेच कॉलनीमध्ये वाय फाय यंत्रणा बसविली आहे. मात्र, सद्या या यंत्रणेकडे चोरट्यांची नजर वळली असून त्याचा फटका अनेकांना बसला आहे. वाय-फाय यंत्रणेचे ‘एलएनबी’ चोरीस जात आहेत.
विद्यानगरी ही शैक्षणिक नगरी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. अनेक शैक्षणिक संस्थानी तसेच क्लासेसनी आपले परिसर वाय-फाय करून घेतलेले आहेत. निवासी संकुलेही वायफाय झाली आहेत. काही लोकांनी खाजगी वायफाय यंत्रणा आपल्या घरावर बसवली आहे. इंटरनेटला जास्त वेग मिळत असल्याने सद्या याचा वापर खूप वाढला आहे.
या संयत्रामधिल सर्वात महत्वपूर्ण घटक आहे एलएनबी हे यंत्र. वाय-फायचे एलएनबी यंत्र घराच्या छतावर बसवावे लागते. एकदा हे यंत्र बसविल्यानंतर याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. संबंधित एलएनबीची किंमत ३ ते ५ हजारापर्यंत आहे. या महत्वपूर्ण यंत्राकडे सद्या चोरट्यांची नजर वळली आहे.
रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेवून ही चोरी केली जात आहे. अपार्टमेंट तसेच संकुलात याकडे कोणाचे लक्ष नसते. त्यामुळे येथील चोरी करण्यासाठी फारसा अडथळा निर्माण होत नाही. याचाच फायदा घेवून येथे मोठ्या प्रमाणत चोरी होत आहे. बंद घर हेरून येथील यंत्रणाही चोरली जात आहे. अनेकांच्या वायफाय यंत्रणेतील एलएनबीची चोरी झाली असूनही कोणीही तक्रारी नोंदवलेल्या नाहीत. याचाही फायदा चोरटे घेत आहेत. तक्रारच होत नसल्यामुळे चोरीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पोलिसांनी याची दखल तपास करण्याची गरज आहे. चोरीचे एलएनबी खरेदी करणारांचा शोध घेतल्यास चोरटे आपोआपच सापडतील. या चोरीच्या प्रकाराची पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. सीसीटीव्ही नसलेली सोसायटी ‘टार्गेट’
अनेक सोसायट्यांंनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. मात्र, अनेकांनी याकडे दूर्लक्ष केलेले आहे. याच कॅमेरे नसलेल्या सोसायट्या चोरट्यांनी टार्गेट केल्या आहेत. विनासायास चोरी करण्याची जागा येथे चोरट्यांना सापडत आहेत.