लोकमत न्यूज नेटवर्कवाई/बावधन : वाईसह परिसराला रविवारी सायंकाळी परतीच्या पावसाने झोडपून काढले. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. विहिरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. रविवारी दुसºया दिवशीही बहुतांश ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. वाई तालुक्यात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तालुक्याला सुमारे दोन तास पावसाने झोडपून काढले. पावसामुळे येथील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारी गणेश चतुर्थी असल्याने गणेश भक्तांनी महागणपती घाटावर मुसळधार पावसातच गणपतीचे दर्शन घेतले. पाणी पातळी वाढल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाईचा कृष्णा घाट पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:59 PM