सातारा : राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील संस्कार वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून चला माणसातील देव पूजूयात या उपक्रमांतर्गत विधवा व कष्टकरी महिलांची पाद्यपूजा केली. कपाळी ल्यायलेल्या हळदी-कुंंकवाच्या साक्षीने साडीचोळीने ओटी भरुन समाजात वैचारिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवत बालमनावर संस्कारही करण्यात आले. शाहूपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत भोसले होते. यावेळी बोलताना भोसले म्हणाले, ‘विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सद्यस्थितीत सर्वांगीण विकास साधायचा झाल्यास त्यांच्या अंतर्मनाची जडणघडण सद्विचारांनी युक्त होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक भान जागृत ठेवणा-या सृजनशील विचारांची पेरणीही गरजेची आहे. सण हे समाजामध्ये चैतन्य निर्माण करुन त्याला एकसंध ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.या नवरात्रोत्सवात मंदिरातील देवीच्या मूर्ती पूजेबरोबरच आपल्या घरातील, अवतीभवतीच्या विधवा महिलांसह सर्व महिलांना ईश्वरस्वरुप मानून तिचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यासाठी नुसते कार्यक्रम करून, फोटोसेशन करून भागणार नाही तर या भूमिकेला हृदयापासून सर्वांनी स्विकारण्याचा संकल्प केला आणि भविष्यात तशी कृती केली तरच उद्याचा समाज निकोप बनू शकेल असा आशावाद व्यक्त केला.याप्रसंगी संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून आपली आई व तिच्या कष्टपूर्ण आयुष्याविषयी विद्यार्थ्यांनी विचार मांडले. शोभा चव्हाण या पालक महिलेने ही वैचारिक परिवर्तनाची लढाई असल्याचे सांगितले. शालाप्रमुख एस. एस. क्षिरसागर यांनी प्रास्ताविक केल. यश गुरव या विद्यार्थ्याने आभार मानले. सूत्रसंचालन पी. एस. निंबाळकर यांनी केले.
चला पूजूया माणसातील देव; साताऱ्यात नवरात्रीत विधवा, कष्टकरी महिलांची केली पाद्यपुजा
By प्रगती पाटील | Published: October 20, 2023 1:13 PM