लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा तालुक्यातील सैदापूर येथील जवान संदीप जयसिंग पवार यांच्या खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. या प्रकरणी जवानाची पत्नी, भावजय आणि मेहुण्याला अटक करण्यात आली आहे. जवानाच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सैदापूर येथील जवान संदीप पवार हे भारतीय सैन्यदलात होते. गावी सुट्टीवर आल्यावर २७ डिसेंबर रोजी संदीप पवार यांना मारहाण झाली होती. गंभीर जखमी झालेल्या पवार यांच्यावर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी चेतना पवार यांनी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात झिरोने गुन्हा वर्ग झाला होता. साताऱ्यात गुन्हा वर्ग झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने खुनाचा उलगडा करण्यासाठी पावले उचलली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून गुन्हा उघड करण्याबाबत सूचना केली. या पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी भेट दिली; तसेच जवानाच्या घरातील व्यक्ती, नातेवाईक, ग्रामस्थांकडे विचारपूस केली. या दरम्यान, घरातील व्यक्ती माहिती लपवून चुकीची उत्तरे देत असल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर काहीजणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर जवान संदीप पवार यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी, भावजय आणि मेहुण्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. जवान पवार हे मद्यप्राशनानंतर शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत होते. याला कंटाळून त्यांना दांडक्याने मारहाण करण्यात आली होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आले.
पोलिसांनी या खून प्रकरणात पत्नी चेतना पवार (रा. सैदापूर), भावजय सुषमा राहुल पवार (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) आणि मेहुणा सोमनाथ भरत आंबवले (रा. खोलवडी, ता. वाई) यांना अटक करण्यात आली. त्यांना सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, साहाय्यक निरीक्षक रमेश गर्जे, साहाय्यक फौजदार ज्योतिराम बर्गे, हवालदार अतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, नीलेश काटकर, गणेश कापरे, रोहित निकम, सचिन ससाने, वैभव सावंत, संजय जाधव यांनी सहभाग घेतला.
फोटो दि.०१सातारा एलसीबी फोटो...
फोटो ओळ : सैदापूर (ता. सातारा) येथील जवान संदीप पवार यांच्या खूनप्रकरणी मेहुण्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला.
...............................