अरुण पवार ल्ल पाटण पाटण तालुक्याच्या माथ्यावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उभा केलाय खरा; पण त्याला कुंपण नसल्यामुळे सांभाळण्यात येणाऱ्या वन्यप्राण्यांची धाव मानवीवस्तीपर्यंत येऊन पोहोचली आहे. दिवसाही प्राणी लोकवस्तीत शिरत आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांत प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो नागरिक हल्ल्यात जखमी झाले आहेत. व्याघ्र प्रकल्प जरूर करा; पण तो वनजमिनीतच असावा, अभयारण्यातील प्राणी बफर झोनमधील गावांमध्ये घुसतात. लोकांवर हल्ले करतात. पिकांची नासधूस करतात. यावर विचार व्हायला हवा. पूर्वी जंगले होती. प्राणीही होते आणि जंगलाशेजारी गावेही होती. मात्र वन्यप्राण्यांचा त्रास नगण्य होता. आज पाटण तालुक्यातील कोयना, मोरणा, ढेबेवाडी विभागातील कसणी, निवी सातर, पांढरपाणी, हुंबरणे, काहीर, मळे-कोळणे, पांथरपुंज नाव, केमसे-नाणेल, बाजे, जिंती, वनकुसवडे आदी शेकडो दुर्गम गावे वन्यप्राण्यांच्या जाचातून सुटका व्हावी, यासाठी धडपडत आहेत. पांढरेपाणी येथे घरात घुसून दुभत्या गाईचे नरडे फोडणारा बिबट्या लोकांनी पाहिला आहे. गव्याने धडक मारल्याने मृत्यू झालेलाही पाहिला आहे. त्यांच्या मुलाने हेलपाटे घातले. ढिगभर कागदपत्रे गोळा केली. अधिकारी, पुढाऱ्यांच्या हातापाया पडले मग बापाच्या मृत्यूबद्दल पाच लाखांची मदत मिळाली. डोंगरकपारीत राहणारी जनता वन्यप्राण्यांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन जगत आहे. रात्र झाली की घराबाहेर पडायचं नाही. सूर्योदय झाल्याशिवाय पाणवठ्यावर पाणी आणायला जायचं नाही, अशी स्थिती आहे. वाघ सांभाळताना येथे शेकडो वर्षे राहणारा माणूस वाचला पाहिजे, याचा विचार शासनाने करायला पाहिजे. केवळ इंटरनेटवर बघून कोअर, बफर आणि सेन्सिटिव्ह झोन ठरविला खरा; पण यामध्ये समाविष्ट केलेल्या गावांतील लोकांना वन्यप्राण्यांमुळे सोसाव्या लागणाऱ्या यातना जाणून घ्यावात, अशी मागणी बफर झोनमधील गावांमधून होत आहे.
कुंपणाअभावी वन्यप्राण्यांची धाव लोकवस्तीकडे!
By admin | Published: September 15, 2015 12:43 AM