जयंत धुळप/वाई - महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरातील जंगल हे अत्यंत महत्त्वाचे आणि विपुल वनसंपदेचे मानले जाते. परिणामी या परिसरात राज्याच्या वन विभागाकडून वन संरक्षण व संवर्धनात्मक विविध उपाययाेजना व उपक्रम राबवण्यात येतात. या परिसरात वन विभागाची यंत्रणा २४ तास सक्रीय कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र जागतिक वन दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवारी (20 मार्च) संध्याकाळी वाईजवळच्या पसरणी घाटातील सलग डाेंगरावर लागलेल्या महाकाय वणव्याने येथील वन विभाग व अन्य संबंधीत शासकीय यंत्रणा पूर्णपणे झाेपलेली आहे, यावरच शिक्कामाेर्तब केले आहे.
वाई येथेच राहाणारे नामांकित छायाचित्रकार सुनील काळे हे पाचगणीहून वाईला जात असताना त्यांनी हा महाकाय वणवा पाहिला. आगीच्या भक्ष्य बनणारी ही सारी हजाराे एकराची वनसंपदा पाहाताना ते अस्वस्थ झाले. वन विभागाच्या काही फाेनवर संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण यश आले नाही. अखेर या महाकाय वणव्याची दखल लाेकमत आॅनलाईनच्या माध्यमातून शासनाने घ्यावी या करिता, चित्रकार काळे यांनी या महाकाय वणव्याचा व्हिडीआे लाेकमतकडे पाठविला आहे.
काही हजार हेक्टरातील वन संपदा पूर्णपणे नष्ट झाली आहे. त्याच बराेबर या जगंलातील प्राणी व विशेषतः पक्षी व त्यांची घरटीदेखील भस्मसात झाली असणार, अशी माहिती चित्रकार काळे यांनी 'लाेकमत'शी बाेलताना दिली आहे.