कोयनानगर (जि. सातरा) : कोयना भागातील येराड ता. पाटण परिसरात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला त्रासले आहेत. या भागात आता मुख्यत: भात, भुईमुग, नाचणी ही पिके असुन वन्यप्राण्यापासुन त्याचे मोठया प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. रानडुक्करांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
येराड, तामकडे या गावांच्या शिवारात रानडुक्करांपासुन ऊसाचे नुकसान केले जात आहे. ऊस खाण्यापेक्षा तो मोडुनच नासधुस केली जात आहे. तसेच डुकरांकडुन गांडुळ, हुमणी वाळवी यासारखे जमिनीतील जीवजंतु खाण्यासाठी शेतात व बांधावर ठिकठिकाणी खड्डे काढले जात आहेत. शेतातुन ये जा करण्यासाठी पिकांमधे हमरस्ता मळला आहे. काही शेतकºयांनी डुकरांच्या त्रासाला कंटाळून भुईमुग पिक करणेच सोडुन दिले आहे. खत, बियाणे, तणनाशक, किटकनाशक यांचे वाढलेले दर तसेच मजुरांची टंचाई व शेतीमालाचे अस्थिर दर यामुळे अगोदरच शेतकरी हतबल झाला असुन यात वन्यप्राण्यांची भर पडली आहे. डोंगरमाथ्यावर दाट झाडीत राहणारे वन्यप्राणी पवनचक्कीमुळे व बेसुमार झालेल्या वृक्षतोडीमूळे हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे स्थलांतरीत होत आहेत. मानवी वस्तीमध्ये राहण्यासाठी ऊस किंवा ओढा नाल्यातील निर्जन जागा निवडत असुन खाण्यासाठी जवळच मुबलक अन्न व पिण्याचे पाणी असल्याने प्राण्यांचा राबता दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसाढवळ्या शेतातुन रानडुकरांचे कळप जात आहेत. हे जीवावर बेतु शकते. त्यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. रानडुकरांसह इतर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शक्कल लढवत आहेत. बांधावर उग्र वासासाठी धुर करणे, संपुर्ण शेताला कुंपन घालणे यासह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. वन्य प्राण्यांकडून हल्ल्याची भिती कोयना विभागातील शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने सध्या शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. यापुर्वी रानडुकरांसह इतर प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी शिवारात जाण्यास घाबरत आहेत. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. |