पांडुरंग भिलारेवाई : थंडी संपली आणि उन्हाचा तडाखा लागू लागल्याने प्राणिमात्रांसह सर्वांनाच झाडाच्या सावलीची गरज भासते. असे असताना वाई तालुक्यात वणवे लावण्यात येत आहेत. मांढरदेव, पिराचीवाडी येथे अज्ञाताने वणवा लावल्याने वनसंपदेचे नुकसान झाले. यावेळी मांढरदेव ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या क्रीडा प्रशिक्षक राजगुरू कोचळे व त्यांच्या खेळाडूंनी खूप प्रयत्न करून वणवा विझविला. यामुळे मोठे नुकसान टळले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, मांढरदेव, पिराचीवाडी हद्दीतील डोंगरात अज्ञाताने सोमवारी वणवा लावला. पाहता पाहता वनसंपदा वणव्यात जळू लागली. त्यातील वन्य प्राणी, पक्ष्यांना रहिवास सोडून पलायन करण्याची वेळ आली, तर जे झळीत सापडले असे काही पक्षी व सरपणाऱ्या प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.
हा वणवा लागल्याचे दिसताच मांढरदेव ॲथलेटिक्स फाउंडेशनचे राजगुरू कोचळे यांनी त्यांच्या अकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंसह तिथे धाव घेतली. काठ्या, झुडपांच्या झाडीने वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीच्या झळांपासून स्वत:चा जीव वाचवण्याची कसरत करत या सर्वांनी दोन, तीन तासांच्या प्रयत्नानंतर हा वणवा विझिवण्यात यश मिळविले. वणवा विझविल्यामुळे शेकडो एकर डोंगराचे वनव्यापासून संरक्षण झाले.वणवा विझविण्यासाठी राजगुरू कोचळे यांच्यासह खेळाडू प्रतीक उंबरकर, ऋतिक उंबरकर, कल्पेश देवरे, तीर्थ गाढवे, आदर्श चव्हाण, सुजल सावंत, ऋतुजा कांबळे, संपदा ढमाळ, श्रावणी लिबे, स्वप्नील कोचळे, ओमकार कोचळे, नामदेव कोचळे, सर्वेश कळंबे, सौरभ पवार व प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांनी पुढाकार घेतला.दरम्यान, वारंवार प्रबोधन करून देखील काही अपप्रवृत्ती वणवा लावत असून अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.