वडूज : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार व अजित पवार यांच्यावर खटाव तालुक्याने प्रेम केले. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीत राष्ट्रवादीनेच काही अपवाद वगळता सत्ता राखली आहे. यातच तालुक्यासाठी एकमेव नगर पंचायत असणाऱ्या वडूज नगरपंचायतीत राष्ट्रवादीने सत्ता काबीज ठेवली आहे. वडूज नगरपंचायतीला स्थापनेपासून पाच वर्षांत पूर्वीच्या ग्रामपंचायतीची चार खोल्यांची जागा बदलून साध्या नवीन जागेतही स्थलांतरण करता आले नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी वडूजला दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
वडूज नगरपंचायत निवडणुकीसाठी अटीतटीची लढत सर्वच पक्षांमध्ये होणार, हे निश्चित असले तरी राष्ट्रवादीला काठावरची सत्ता कायम राखण्यासाठी लक्षवेधी व ठोस विकासकामांची पूर्तता सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण होणे अपेक्षित आहे. नूतन पाण्याची टाकी, विविध स्मशानभूमी, शववाहिका आदी आश्वासक कामाशिवाय कित्येक प्रश्न मार्गी लागले गेले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुष शौचालय, धूळ खात असलेले क्रीडा संकुल, सार्वजनिक स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते व गटारे, बसस्थानक इमारत, शहरातील दुर्लक्षित आरोग्य केंद्र, आठवडे बाजाराची समस्या, अग्निशामक, रुग्णवाहिका आणि गेलेले प्रांत कार्यालय परत आणण्यासाठी दुर्लक्षित राहिलेल्या ज्वलंत प्रश्नांचा लेखाजोखा येणाऱ्या निवडणुकीत मतदारांना सांगावा लागणार आहे. या पाठीमागे येथील राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व लाभार्थी समन्वयाच्या अभावी इमारत स्थलांतराबाबत जबाबदारी झटकत आहेत. याबाबत प्रशासनही तितकेच जबाबदार धरले जात आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी, नागरिकांना हालअपेष्टामध्ये राहावे लागत असल्याने वडूजकरांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीची सत्तेतील नगरपंचायत मोडक्या इमारतीच्या अडगळीतून बाहेर पडणार का? दादा जागेवरतीच निपटारा करणार... अशी ख्याती असलेल्या अजीत पवार यांनी वडूज नगरपंचायतीच्या इमारत स्थलांतराचा जिव्हाळ्याचा प्रश्न प्रत्यक्ष पाहणी करून मार्गी लावावा, अशी अपेक्षा वडूजकरवासीयांसह तालुक्यातील जनतेतून होत आहे. नगर पंचायतीचे कर्मचारी, नगरसेवक व नागरिकांना सुस्थितीत व्यवस्थापन चालविण्यासाठी साधी पुरेशी इमारत उपलब्ध होऊ शकत नाही. वास्तविक वडूज नगरपंचायतीसाठी भव्यदिव्य सर्व सोयीयुक्त जुनी तहसील इमारत धूळ खात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाममात्र भाडेतत्त्वावर ही इमारत नगरपंचायतीसाठी मिळत असताना काही सत्तेतील नगरसेवकांच्या उदासिनतेमुळे अडगळीतच कारभार सुरू आहे.