सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी कधी पकडणार? असा संतप्त सवाल महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, १८ डिसेंबर रोजी ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या २० डिसेंबर रोजी ५२ महिने पूर्ण होत आहेत, तसेच गोविंद पानसरे यांच्या हत्येलादेखील ३४ महिने पूर्ण होत आहेत. या दोन्ही हत्यांप्रकरणी तपास यंत्रणांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे, परंतु दाभोलकर आणि पानसरे यांचे फरार संशयित मारेकरी विनय पवार व सारंग अकोलकर यांना पकडण्यात महाराष्टÑ शासन व सीबीआय दिरंगाई करीत आहे. सीबीआयने दोन संशयित मारेकºयांवर प्रत्येकी पाच लाखांची बक्षिसे दाखल केलेली आहेत. महाराष्ट्र शासनानेदेखील पानसरे हत्याप्रकरणी दोघांच्यावर बक्षीस जाहीर केलेले आहे. त्यांना फरार घोषित करून, त्यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची प्रक्रिया अजून झालेली नाही. शासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे विवेकवादी लोकांना असलेला धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरेंचे मारेकरी कधी पकडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:35 PM