फलटण : फलटण ते पंढरपूर रेल्वेसाठी लवकरच निधीची तरतूद करणार आहे. हा मार्ग लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिली. दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी ग्वाही दिली.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, ‘फलटण-पंढरपूर हा रेल्वे मार्ग सुरू व्हावा यासाठी शंभर वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजांच्या काळामध्ये जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्येसुद्धा हे काम अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार केंद्र शासनाच्या बरोबरच रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के वाटा उचलायला तयार आहे, अशा पद्धतीचे पत्र केंद्र सरकारकडे पाठवले होते. परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत महविकास आघाडीने कोणतीही भूमिका घेतली नाही. जमिनीचे अधिग्रहण व सर्वेक्षण पूर्ण होऊनसुद्धाही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.आता पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातल्या व देशातील पांडुरंगाच्या भक्तांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. महाराष्ट्रातील नव्हे तर कर्नाटक, गोवा, तेलंगण, आंध्र प्रदेश राज्यातून लाखो भक्त हे पंढरपूरमध्ये दरवर्षी येत असतात. आषाढी यात्रेच्या निमित्ताने करोडो लोक यात्रेमध्ये सहभागी होतात. कार्तिक, माघ, श्रावण, महिन्यामध्ये अनेक भाविक पंढरपूरला भेट देत असतात. ही रेल्वे सुरू झाल्यास लाखो भक्तांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या भागाचा आर्थिक विकास बरोबर सर्वांगीण विकास होईल.या भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे या भागाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे. मोदी सरकारने पुणे-फलटण रेल्वे सुरू करून निम्मे काम पूर्ण केले आहे. फलटण-पंढरपूर रेल्वे सुरू झाल्यास संपूर्ण देशातून पंढरपूरमध्ये भाविक येण्यास याची मदत होईल. याची माहिती खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी निदर्शनास दिले.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी तातडीने याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने निधी देण्याबाबत लवकरच बैठक घेण्याची सूचना केली आहे.
फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करणार, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना रेल्वेमंत्र्यांकडून ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 6:31 PM