सातारा : ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आतून गद्दारी करणाऱ्यांची गोपनीय माहिती घेण्याचे काम पक्षाने सुरू केले आहे. दाखविण्यापुरते सोबत राहिले, पण पक्षाच्या उमेदवाराविरोधात ज्यांनी कागाळ्या केल्या, त्यांची भविष्यात पदे काढून घेण्यात येतील’, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.राष्ट्रवादी भवनात गुरुवारी नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारानंतर अध्यक्षांच्या दालनात आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी बातचित केली. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘विधान परिषदेतील गद्दारीचा अनुभव पाठीशी असल्याने आम्ही सर्व आमदारांच्या सूचनेनुसार प्रामाणिक लोकांना उमेदवारी दिली होती. पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्यांचाच यापुढे विचार केला जाणार आहे. राष्ट्रवादीने उभ्या केलेल्या उमेदवारांविरोधात ‘आतून’ गद्दारी करणाऱ्यांचा अहवाल लवकरच समोर येईल. ज्यांनी गद्दारी केली आहे, अशांच्या विरोधात पक्षाकडे गुप्तपत्रे पाठविण्याच्या सूचना मी सदस्यांना केल्या आहेत. काही दिवसांत ज्यांनी गद्दारी केली, त्यांचे चेहरे समोर येतील, या मंडळींना पक्षातर्फे दिल्या जाणाऱ्या पदांपासून वंचित ठेवण्यात येईल.’निर्णय पवारांशी बोलूनचजिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये पदाधिकारी निवडीबाबत एकमताने निर्णय घेतला जाईल, कुणावर अन्याय होऊ नये, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. उद्या, शनिवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व नेते आमदार अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सूचनेनुसारच पदाधिकारी निवडीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.अपक्षाचा ‘उदय’ राष्ट्रवादीला ‘कबूल’शिरवळ गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन भरगुडे-पाटील यांचा पराभव करून निवडून आलेले अपक्ष उमेदवार उदय कबुले यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयात हजर राहून आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीने त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे चिन्ह असलेला पट्टा घातला.
गद्दारांची पदे काढून घेणार
By admin | Published: March 02, 2017 11:33 PM