सातारा : कोरोना महामारीने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने ही महामारी रोखून धरण्यासाठी पुन्हा नव्याने रणनीती आखली आहे. कोरोना संशयित रुग्णांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात येत असून अशा व्यक्ती जर घराबाहेर फिरताना आढळल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात या बाबींना मनाई
१) सातारा जिल्ह्यात रात्रीच्या ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
२) इयत्ता ९ वीपर्यंत सर्व वर्ग (निवासी शाळा वगळून), प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील.
३)सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम (यात्रा/जत्रा इत्यादी) तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा तसेच सभा मंडप, मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रम बंद राहतील. याबाबत उल्लंघन झाल्यास शासनाचे दिनांक १५ मार्च व १७ मार्च २०२१ चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- १९ साथीचा रोग आटोक्यात आल्याचे जाहीर होत नाही तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील.
४) सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे.
५) पाचपेक्षा जास्त व्यक्तींना, रात्रीच्या ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात या बाबींना परवानगी मात्र बंधन कायम
१) मॉल, हॉटेल, फूड कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी देत आहे.
२) कन्टेन्मेंट झोन बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/थिएटर/मल्टिप्लेक्स/ नाटक थिएटर हे आसनाच्या ५० टक्के क्षमतेने सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहील. यामध्ये कोणत्याही खाण्यायोग्य वस्तूंना परवानगी दिली जाणार नाही.
४) प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करण्याकामी संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
..असा होईल दंड
१) सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याच्या तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रुपये दंड आकारावा.
२) सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खासगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास १००० रुपये दंड आकारावा.
३) दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान ६ फूट अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागासाठी रु.२००० व शहरी भागासाठी रु. ३००० दंड आकारावा. तसेच ७ दिवसापर्यंत दुकान सक्तीने बंद करावे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
कोट
गृहअलगीकरण झालेल्या नागरिक/रुग्णाविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच गृहअलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाच्या (डॉक्टर) यांच्या देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक आहे.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी