सातारा : भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील नळ कनेक्शन बंद करण्यासह ग्रेड सेरपेटरमधून सातत्याने वाहणारे पाणी थांबविण्यासााठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय सातारा पालिकेतील पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक सातारा पालिकेत घेण्यात आली. या बैठकीमध्ये नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील पाणी गळती रोखण्यासह विविध सूचना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
बैठकीला नगराध्यक्षा माधवी कदम, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, नगरसेवक निशांत पाटील, ज्ञानेश्वर फरांदे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, बाळासाहेब ढेकणे आदी उपस्थित होते.
शहरातील टाक्यांना रंगकाम करुन सुशोभिकरण करणे, दरे खुर्द, शाहूपुरी या ग्रामपंचायती पालिकेकडे वर्ग झाल्यामुळे दि. ३१ मार्चपर्यंत या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, कास धरणाची उंची वाढल्यानंतर सांबरवाडी येथून बोगदा ते चारभिंतीवरील टाकीत पाणी टाकून तेथून गोडोली व परिसरातील भागाला पाणीपुरवठा करणे, सुमित्राराजे उद्यानात नवीन बोअरिंग बसवणे, तालुका पोलीस स्टेशनच्या शेजारी असणाऱ्या पाणीसाठवण टाकीला रंगरंगोटी करणे, मोळाचा ओढा येथील पाईपलाईनची तसेच दरे बुद्रुक पाणीपुरवठा योजनेची पाहणी करणे, साक्षी पार्क येथील पाईपलाईन कनेक्शन तपासणी करणे, शाहूपुरी पाणीपुरवठा योजनेची पाहणी करणे तसेच भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील नळ कनेक्शन बंद करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
फोटो : १८ सातारा पालिका मिटिंग
सातारा पालिकेत नगराध्यक्षा माधवी कदम, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा समितीची बैठक पार पडली.