चाफळ : ‘सातारा जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे आश्वासन जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिले.
आमदार कपिल पाटील यांच्या आवाहनानुसार राज्यभर होत असलेल्या धरणे आंदोलनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेच्या सातारा जिल्हा शाखेच्यावतीने जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मागण्यांचे लेखी निवेदन शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे पुणे विभागीय संघटक अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष अनिलकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जगदाळे बोलत होते. याप्रसंगी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष हणमंतराव काटे, जिल्हा संघटक सुभाष निकम, शिक्षक भारती सातारा जिल्हा अध्यक्ष जहाॅगीर पटेल उपस्थित होते.
यावेळी अर्जुन पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यातील काही केंद्रप्रमुखांना सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीची वेतनवाढ व ग्रेड पे देण्यात आला. संबंधित वेतनवाढ व वेतनश्रेणी, वेतन निश्चिती यास लेखाधिकारी यांनी मंजुरी दिली. लेखापरीक्षणवेळी लेखापरीक्षकांनी वेतनवाढ व ग्रेड पे अतिरिक्त वेतन ठरवून आर्थिक वसुली करणेबाबत सेवा पुस्तकात नोंदी घेतल्या आहेत. केंद्रप्रमुख सेवानिवृत्तीवेळी संबंधित आर्थिक वसुली केली आहे व सुरू आहे.’