लोकमत न्यूज नेटवर्कक-हाड (जि.सातारा) : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवले आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलो, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे हे मतलबी सरकार सत्तेतून जाईल. ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेसला पुन्हा कौल मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केला.कºहाड येथे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचा राजकीय, सामाजिक वाटचालीचा सुवर्ण महोत्सव व १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम झाला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते. शिंदे म्हणाले, देश कुठे चालला आहे, हे कळत नाही. देशात हुकूमशाही वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. मी केंद्रीय गृहमंत्री असतानाही अनेक गोष्टी केल्या; पण त्याचा कधी गाजावाजा केला नाही. खरेतर गृहमंत्री म्हणून काम करीत असताना अनेक गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात. आमच्या काळातही मिलीटरी स्ट्राईक झाले होते. पण त्यास ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे गोंडस नाव देऊन आम्ही काही तरी वेगळे केले आहे, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.काँग्रेसचा एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल तीनवेळा पराभव झाला आणि आता काँग्रेस संपली अशा वल्गना सुरू झाल्या.मात्र काँग्रेस कधी संपली नाही आणि संपणार नाही. काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली. देशातील आणि राज्यातील सद्य:स्थिती पाहता जनतेमध्ये प्रचंड संताप आहे, काँगे्रस पुन्हा भरारी घेईल, असे त्यांनी सांगितले.ईव्हीएमच्या गडबडीवर टीकाआम्ही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर प्रेम करणारी माणसे आहोत. पराभूत झालो म्हणून हारणारे नाही. ज्या इंदिरा गांधींचा लोकांनी पराभव केला. त्याच इंदिरा गांधींना लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिल्याचा इतिहास आहे. अन् तेही बटण दाबून नव्हे, असे म्हणत शिंदे यांनी ईव्हीएम मशिनच्या गडबडीवर टीका केली.
मतलबी सरकार सत्तेतून जाईल, काँग्रेसला पुन्हा कौल मिळेल - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 4:19 AM