पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, बाधित रुग्ण संख्यादेखील वाढत आहे. तालुक्यातील आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासन यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पाटण तालुक्यातील कोरोना या भयंकर महासंसर्ग रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक लागणारी सामग्री म्हणजेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडअभावी लोकांचे जीवन संपत आहे. यासाठी पाटण तालुक्यातील पवनचक्की कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजाची गरज ओळखून जनतेच्या कल्याणासाठी पुढाकार घेऊन तालुक्यात स्वत:चे कोविड सेंटर उभारून ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी पाटण तालुका मनसेच्या वतीने तालुका अध्यक्ष गोरख नारकर यांनी निवेदन देऊन केली.
निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुका हा दऱ्याखोऱ्यात वसलेला असल्याने अजून काही ठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचल्या नाहीत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधांसाठी कराड आणि सातारा या ठिकाणी जावे लागत आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत समाजातील अनेक सामाजिक संस्था पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाशी लढत आहेत. तरीदेखील तालुक्यातील जनतेला सुविधांची कमतरता भासत आहे.
तालुक्यातील डोंगर पठारावर वसलेल्या आणि तालुक्यातील वाऱ्यावर आपले उत्पन्न घेऊन आर्थिक फायद्यात आहेत. या सर्व पवन चक्की कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून सामाजिक भावनेतून या कोरोना काळात स्थानिक नागरिकांना मदत केली पाहिजे. कोरोनाच्या काळात अद्ययावात असे कोविड सेंटर उभारावे किंवा तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये कोविड सेंटरकरिता ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची मदत करावी, जेणेकरून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधेसाठी कराड किंवा सातारा येथे जावे लागणार नाही आणि त्यांना तालुक्यातीलच कोविडचे उपचार वेळेत मिळतील. लोकांचे जीव वाचतील. यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एक पाऊल पुढे टाकावे, अशी मागणी पाटण तालुका मनसेच्या वतीने करण्यात आली. याबाबत पवन चक्की कंपनीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा मनसे आक्रमक पवित्रा हाती घेईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष गोरख भाऊ नारकर, शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर उपस्थित होते.