कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील विंग जिल्हा परिषद गटात सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, तर दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला उंडाळकर गटाची तर काही ठिकाणी अतुल भोसले गटाची साथ मिळाल्याने सत्ता कायम राखण्यात यश आले आहे, तर काही ठिकाणी भोसले गटाने उंडाळकर - चव्हाण गटाविरुद्ध लढत दिली. एकंदरीत विभागात ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र आहे.
कऱ्हाड तालुक्यातील विंग ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल भोसले गट आणि चव्हाण गट एकत्र येत उंडाळकर गटाला लढत दिली होती. या लढतीमध्ये पंधरापैकी दहा जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखण्यात खबाले यांना यश आले आहे.
येरवळे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सर्वपक्षीय विरुद्ध अपक्षांनी लढत दिल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अकरापैकी दोन जागांवरच अपक्षांना समाधान मानावे लागले, तर महाविकास आघाडीने नऊ जागा मिळवत सत्ता कायम राखली आहे.
शिंदेवाडी-विंग ग्रामपंचायतीमध्ये पाच जागांसाठी झालेल्या लढतीत पूर्वी चव्हाण गटातून सत्तेत असलेल्या सरपंचांनी अतुल भोसले गटाच्या माध्यमातून चार जागा मिळविल्या, तर चव्हाण गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
पोतले ग्रामपंचायतीमध्ये चव्हाण गट आणि उंडाळकर गट एकत्र येऊन संमिश्र गटाशी लढत दिली होती. यामध्ये नऊपैकी तीन जागा संमिश्र गटाला मिळाल्या असून सहा जागा उंडाळकर-चव्हाण गटाला मिळाल्या आहेत. सत्ता कायम ठेवण्यात या गटाला यश आले आहे.
घारेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तिन्हीही गट स्वतंत्र लढल्याने कोणालाही बहुमत नाही. नऊ जागांसाठी झालेल्या लढतीत अतुल भोसले गट तीन, उंडाळकर गट दोन तर चव्हाण गटाला चार जागा मिळविण्यात यश आले आहे. चव्हाण गटाची या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता होती. कोळे ग्रामपंचायत निवडणुकीत चव्हाण गट आणि उंडाळकर गट एकत्र येत भोसले गटाला लढत दिली होती. यामध्ये चव्हाण-उंडाळकर गटाने बारा जागांवर विजय मिळविला, तर सत्ताधारी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
बामणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सातपैकी काका गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या, तर पाच जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये अतुल भोसले गटाने प्रथमच निवडणुकीत रणशिंग फुंकून दोन उमेदवार उभे केले होते. ते दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले, तर चव्हाण-उंडाळकर गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायतीत उंडाळकर गटाची सत्ता होती. येणके आणि अंबवडे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.