कऱ्हाड : विंग, ता. कऱ्हाड येथील चित्रकार बी. एस. तथा बाबा पवार यांच्या काव्यचित्र शुभेच्छापत्र या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाली आहे. यानिमित्ताने शब्दवेध संस्थेच्यावतीने पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करीत शुभेच्छापत्रांचा तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला.कऱ्हाड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कऱ्हाड अर्बन बँकेचे संचालक अॅड. संभाजीराव मोहिते व ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांच्याहस्ते बाबा पवार यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी महाबळेश्वर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, कऱ्हाड शिक्षण मंडळाचे सहसचिव राजेंद्र लाटकर, ओंड येथील पीजीव्हीपी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सुलभा शिंदे, पर्यवेक्षक रमेश गुरव, ओंड शिक्षण मंडळाचे सचिव शंकरराव थोरात, संचालक शरद शिंदे उपस्थित होते.चित्रकार पवार यांनी समाजाचे वास्तव चित्रण मांडणारी काव्यचित्र संकल्पना राबवून वैविध्यपूर्ण व आशयपूर्ण शुभेच्छापत्रे साकारली आहेत. हा उपक्रम सलग राबवून त्यांनी राष्ट्रीय विक्रम केला आहे.
या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. पवार चित्र, शिल्प व जादूचे प्रयोग या माध्यमातून समाजजागृती करीत आहेत. त्रिनेत्रनाथ जोशी यांनी प्रास्ताविक केले. मानसी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माधुरी कुराडे यांनी आभार मानले.