वडूज : ‘पोटासाठी कायपण’ हेच ब्रीदवाक्य अंगी बाळगून भर लोकवस्तीत वानरांच्या टोळीने उच्छांद मांडून आणि प्रसंगी लोकांना गंभीर जखमी करणाऱ्या माकडांनी मुख्य बाजारपेठेतील पेठकऱ्यांचे जीवन गत पंधरा दिवसांपासून हैराण केले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.वडूज परिसरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड आणि काहीच खायला न मिळाल्यामुळे या परिसरातील माकडे आक्रमक झाली असल्याने लोकवस्तीमध्ये दहशत माजवत आहे. वानरांना हाकलताना शाळकरी दोन मुली, एक तीन वर्षांचा मुलगा तर इतर वयोवृद्ध व्यक्ती जखमी आहेत. आत्तापर्यंत जखमी झालेल्या व्यक्तींना ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यानंतर वनविभागाकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आमच्याकडे पिंजरा नाही आणि माकडे धरणारे कर्मचारी नसल्याचे उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश तोडकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हकीगत सांगितली. याबाबत ग्रामपंचायतीने या वानरांचा बंदोबस्त करावा, या आशयाचा ठराव करून वनविभागाकडे सादर करून देखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही.गत पंधरा दिवसांपासून हैराण झालेले पेठकरी आपले दैनंदिन जीवनमान घाबरतच व्यतीत करीत आहेत. याच रस्त्यावरून शाळेला ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या जादा आहे. तर याच परिसरात चावडी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफिस आणि मंदिरांची संख्या जादा असल्याने वर्दळ जादा असते.यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)या टोळीचे वारंवार होणारे आक्रमण पाहून पेठकरी गर्भगळीत झालेले दिसून येत आहेत. किराणा दुकानामध्ये बसलेल्या एका युवकाच्या हाताला चावा घेतला तर शाळकरी मुलींना भररस्त्यात धक्के देऊन पाडले आणि लहान मुलाच्या पाठीवर नखांचे ओरखडे ओढल्याने येथील सर्व नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.
वानरांच्या दहशतीने वडूजकर हैराण
By admin | Published: February 02, 2015 9:40 PM