सचिन जवळकोटे ल्ल सातारा दोन महिन्यांपूर्वी जी ‘भाकरी’ फिरवायला सातार्याचे काही ‘वस्ताद’ निघाले होते, तीच आता एवढी टम्म फुगलीय की विचारता सोय नाही! देशाचा ‘ट्रेंड’ काही का असेना, पण सातार्याची ‘क्रेझ’ जगावेगळीच असते, हेही या निमित्ताने सर्वांना कळून चुकलंय. सातारा लोकसभेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राजेंनी चांगलंच लीड घेतलं. विशेष म्हणजे ज्या सातारा शहरात ‘आप’चे राजेंद्र चोरगे त्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत होते, तिथेही सर्वाधिक मताधिक्य राजेंनी खेचलंय. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचा विरोध डावलून शरद पवारांनी सातार्यात घेतलेला निर्णय राजेंनी अचूक ठरविला. राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांसह विरोधकांचे सर्व आडाखे मोडीत काढत सातार्याचे उदयनराजे दणदणीत जिंकले; परंतु शेजारच्या माढा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा चक्क हरले. ज्या ठिकाणी गेल्या वेळेस पवार तीन लाखांपेक्षाही जास्त मताधिक्यानं निवडून आले होते, तिथेच त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रत्येक फेरीत तावून-सलाखून निघाले. माढा लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विक्रमी मताधिक्याला धक्का लागला. गेल्या वेळेस या माढ्यात पवारांनी तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य खेचलं होतं. यंदा मात्र पहिल्या फेरीपासूनच अकलूजकरांची दमछाक होत होती. काही फेर्यांमध्ये तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत निवडून येतात की काय असं चित्र दिसत होतं. मात्र विजयसिंह मोहिते-पाटलांनी शेवटच्या टप्प्यात विजय खेचून आणला. पंढरपुरातील पराभवाचा डाग अखेर धुऊन काढला. पवारांचा विक्रम मोडला... मोदी लाटेत महाराष्ट्रातली सत्ताधारी आघाडी पुरती वाहून जात असताना केवळ एक म्हणजे एक नेत्याने राष्ट्रवादीची इज्जत राखली. सातारा लोकसभा मतदार संघात तब्बल ३ लाख ६६ हजार मताधिक्य घेऊन उदयनराजेंनी पवारांचाच जुना विक्रम मोडला. जिल्ह्याचं राजकारण बदलणार गेली पाच वर्षे उदयनराजेंना जिल्ह्याच्या प्रमुख प्रवाहापासून पद्धतशीरपणे बाजूला ठेवले गेले. जिल्हा बँक असो की जिल्हा परिषद, तेथे स्वतंत्र राजेगट कधीच अस्तित्वात नव्हता. राजेंच्या नावानं घोषणाबाजी करत फिरणारा तरूणवर्ग एवढीच त्यांच्या गटाची ओळख होती. परंतु कालच्या निकालानं जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा नक्कीच बदलणार आहे. मोदी लाटेतही राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं यश मिळविणारा राष्ट्रवादीचा नेता म्हणून राजेंची प्रतिमा बनलीय. त्यांचा राजकीय दरारा अधिकच वाढलाय. त्यामुळं यापुढं जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना वगळून कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना सर्वांनाच विचार करावा लागणार आहे. राजे जिंकले; पवार हरले! माढामध्ये विजयदादांचे बंधू प्रतापसिंह यांच्या बंडखोरीमुळे सोलापूर जिल्ह्यातील मतांमध्ये विभागणी झाली तरी सातारा जिल्ह्यातील मताधिक्यामुळे ती तूट भरून काढता येईल, असं सुरुवातीला सर्वांना वाटलं. मात्र, ज्या फलटण विधानसभा मतदारसंघातून गतवेळेस शरद पवारांना तब्बल ६४ हजारांचे मताधिक्य मिळालं होतं तिथं यंदा सदाभाऊ खोतांनी ६०६ मतांची आघाडी घेतली. तसंच ज्या माण-खटावमध्ये पवारांना ३८ हजारांचं मताधिक्य दिलं होतं, तिथं आज अवघ्या १६५२ हजारांचं लीड विजयदादांना मिळालंय. याचा अर्थ पवारांचं वलय नष्ट झालंय. म्हणजे सातारा जिल्ह्यात एकीकडे राजे जिंकले, पण दुसरीकडे पवार हरले!
भाकरी फुगविणारे ‘वस्ताद’ दणदणीत विजय : ‘ट्रेंड’ काहीही असो; सातारची ‘क्रेझ’ वेगळीच
By admin | Published: May 18, 2014 12:09 AM