आॅनलाईन लोकमतसातारा, दि.१३ : सातारा जिल्ह्यातील शहरांमध्ये हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शहरांमधील रस्ते अरुंद आहेत. येथील वाहनांचा वेग खूपच कमी असतो. त्यामुळे हेल्मेट सक्ती करू नये, अशी मागणी साताकरांमधून केली जात होती. या लोकभावनांचा आदर करुन पोलिसांनी हेल्मेट सक्ती मागे घेतली. त्यामुळे सातारकरांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी १५ जुलैपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा आदेश दिला होता. यानंतर विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी या हेल्मेट सक्ती विरोधात दंड थोपटले होते. हेल्मेट सक्तीला सातारकरांचा वाढता विरोध पाहता आयजी नांगरे पाटील यांनी मवाळ भूमिका घेत सातारकरांच्या भावनेचा आदर करून हेल्मेट सक्ती मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सातारकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.वास्तविक साताऱ्यामध्ये रस्ते अरूंद असल्यामुळे वाहनांचा वेगही कमी असतो. त्यातच केवळ इनमीन तीन रस्ते असल्यामुळे अपसूकच वेगावर नियंत्रण येत असते. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती नकोच, अशी भूमिका सातारकरांनी घेतली होती. हेल्मेट सक्ती होण्यास केवळ दोन दिवस बाकी असतानाच पोलिसांनी हेल्मेट सक्ती मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सातारकरांच्या जीवात जीव आला.पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी पोलिस मुख्यालयात गर्दी केली होती. हेल्मेट सक्ती रद्द झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. हातात पुष्पगुच्छ आणि पेढे घेऊन नागरिक पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी जात होते. यामुळे पोलिस मुख्यालयातील माहोलच बदलून गेला.
लोकभावना जिंकली... हेल्मेटची कटकट मिटली !
By admin | Published: July 13, 2017 3:23 PM