मसूर : कोरोनाच्या महामारीत आपले कर्तव्य बजावताना ऊन, वारा, पावसाचा सामना करत जनसेवा करणारे कोरोना योद्धा वायरमन नितीन प्रकाश मांढरे यांनी वाढदिवसाचा डामडौल बाजूला ठेवत, पत्नी शीतलसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कवठे येथील ग्रामपंचायतीस २० लीटर सॅनिटायझर दिले, तसेच कवठे व नवीन कवठे येथील निराधार १० महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे घरीच रहा सुरक्षित राहा, असा संदेश शासन जनतेला देत आहे. मात्र, जनतेच्या दैनंदिन गरजेपैकी एक असलेल्या विजेचे काम करणारे वायरमन वेळोवेळी वीज उपलब्ध करून देण्याचे काम करत असतात. अशाच प्रकारे सेवा देणारे वायरमन नितीन मांढरे यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत कोरोनाच्या महामारीत सामाजिक उपक्रमाला हातभार लावण्याचे काम केले आहे.
उपसरपंच गणेश घार्गे, सदस्य भिकाजी साळुंखे, अधिकराव यादव, पोलीस पाटील मारुती यादव, धनाजी पाटोळे, विश्वासराव माने, राजाराम यादव, विकास चव्हाण, शंकर ताटे आदींची उपस्थिती होती.
कोट
कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांवर महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा करून अनाठायी पैसा खर्च करण्यापेक्षा त्या पैशाचा समाजासाठी उपयोग करावा, ही कल्पना मनात आली व ती सत्यात उतरावयाचे ठरवले. त्यानुसार, या दोन्ही गावांतील निराधार महिलांची नावे घेतली व त्यानुसार त्यांच्या घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले, तसेच नवीन कवठे गावच्या ग्रामपंचायतीस घरोघरी वाटप करण्यासाठी २० लीटर सॅनिटायझर दिले.
नितीन मांढरे - वरिष्ठ तंत्रज्ञ, एमएसईबी