मलकापूर : नाले तुंबल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे सेवा रस्ते जलमय झाले होते. तेथून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महामार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत होता. याबाबतचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महामार्ग देखभालच्या कर्मचाऱ्यांनी तुंबलेल्या नाल्याची जेसीबीने साफसफाई केली.
मलकापूर परिसरात महामार्ग रूंदीकरणावेळी महामार्ग व उपमार्गालगत दोन्ही बाजूला सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची निर्मिती केलेली आहे. या नाल्यात टाकलेला कचरा व मुख्य ओढ्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे ठिकठिकाणी नाले तुंबले आहेत. येथील भारत मोटर्ससमोर गटाराचे घाण पाणी रस्त्यावर पसरल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागातून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. तर नाल्यातील घाण रस्त्यांवर पसरल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. त्याचबरोबर या परिसरातील बहुतांशी ओढ्यांवर अतिक्रमण झाले आहे. या ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्यांची पोती टाकली आहेत. कचऱ्याने मोऱ्या तुंबल्या आहेत. अशा तुंबलेल्या मोऱ्या रिकाम्या करणे गरजेचे आहे. अनेक भुयारी नाल्यात कचरा अडकल्याने नाले ठिकठिकाणी तुंबले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उपमार्ग जलमय झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला जीव मुठीत घेऊन विरुद्ध दिशेने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
याठिकाणी बरेच दिवस उपमार्गावर साचलेल्या पाण्यातुनच ये-जा करण्यास भाग पाडत असून संबंधित प्रशासन गांधारीच्या भुमिकेत दिसत आहे. याबाबतचे वृत ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच महामार्ग देखभाल विभागाला जाग आली. तातडीने या परिसरातील उपमार्गालगतचा नाला जेसीबी मशीनने साफसफाई केली. नाल्याचे पाणी प्रवाहीत झाल्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांसह प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो : २०केआरडी०३
कॅप्शन : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या नाल्यांची देखभाल विभागाकडून स्वच्छता करण्यात येत आहे.