सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सोळा जण निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. निवडणुकीचे चित्र यापूर्वीच स्पष्ट झाले असून, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांमध्येच दुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, चिन्हांचेही वाटप अपक्ष उमेदवारांना करण्यात आले.सातारा लोकसभेसाठी एकूण २४ उमेदवारांनी ३३ नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. यापैकी छाननीमध्ये २१ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध, तर ३ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरली. यानंतर दि. २२ रोजी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. अखेरच्या दिवसापर्यंत एकूण पाच जणांनी अर्ज माघारी घेतले.
यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात एकूण सोळा जण राहिले आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले (भाजप), शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), आनंद रमेश थोरवडे बहुजन समाज पार्टी, प्रशांत रघुनाथ कदम वंचित बहुजन आघाडी, तुषार विजय मोतलिंग बहुजन मुक्ती पार्टी, सयाजी गणपत वाघमारे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, डॉ. अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले अपक्ष,सुरेशराव दिनकर कोरडे अपक्ष, संजय कोंडीबा गाडे अपक्ष, निवृत्ती केरू शिंदे अपक्ष, प्रतिभा शेलार अपक्ष, सदाशिव साहेबराव बागल अपक्ष, मारुती धोंडीराम जानकर अपक्ष, विश्वजित पाटील-उंडाळकर अपक्ष, सचिन सुभाष महाजन अपक्ष, सीमा सुनील पोतदार अपक्ष असे एकूण सोळा उमेदवार असले तरी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातच थेट लढत होत आहे.
प्रत्येक ठिकाणी दोन ईव्हीएम मशिन्सएका ईव्हीएम मशीनवर केवळ १६ नावे राहू शकतात. एका मतदारसंघात १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी १६ उमेदवार असले तरी नोटाचा पर्याय धरून एकूण १७ नावे होणार आहेत. यामुळे सातारा मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी दोन ईव्हीएमचा वापर करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची तयारी करून ठेवली आहे.