म्हसवड : चिलारवाडी ता. माण येथील डोंगरावर मेंढ्यांना चरावयास सोडले असताना मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला केला. यामध्ये एका मेंढीचा मृत्यू झाला असून मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. विरळी, चिलारवाडी परिसरात लांडग्यांच्या वावरामुळे मेंढपाळ दहशतीखाली आहेत. वन विभागाने लांडग्यांचा बंदोबस्त करून विरळी, चिलारवाडी परिसर दहशतमुक्त करावा, अशी मागणी होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, विरळीनजीक डोंगराळ भागात चिलारवाडी गाव आहे. या गावाच्या वरती डोंगरावर सिद्धनाथ मंदिराच्या पाठीमागे, सोनबा वालाप्पा घुटूकडे हे मेंढपाळ आपली मेंढरे चारायला घेऊन गेलेले असताना, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक तीन लांडग्यांनी चाल केली. त्यातील दोन लांडगे सोनबाच्या दिशेने आले व एका लांडग्याने मेंढी पकडली आणि काही सेकंदात मेंढीचा गळा फोडला. मेंढपाळ त्या मेंढीच्या दिशेने गेला असता लांडग्यांनी त्याच्यावर चाल केली. तसे त्यांनी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून बाजूला असलेले दुसरे मेंढपाळ साजन मासाळ धावून आले. दोघांनी कुत्राच्या साहाय्याने लाडग्यांना हुसकावून लावले. त्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला मोबाईलद्वारे माहिती दिली. याल एक दिवस होऊनही वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.