रहिमतपूर : शिवारात वाला घेवड्याच्या शेंगा तोडणाऱ्या महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात डुकराचे दात लागल्याने महिला जखमी झाली. मंगल अरुण पवार (वय ४५, रा. पवारवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. पवार यांच्या हातांना मोठी जखम झाल्याने तब्बल २५ टाके पडले आहेत. कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील पिराचे शेत नावाच्या शिवारात ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, मंगल पवार या काल, गुरूवारी सायंकाळी लहान मुलगी साक्षी हिला घेऊन भाजीपाला आणण्यासाठी पिराचे शेत नावाच्या शिवारातील शेतात गेल्या होत्या. साक्षीला बोरीच्या झाडाखाली बसवून साडेचारच्या सुमारास मंगल पवार या वालघेवड्याच्या शेंगा तोडत होत्या. त्याच वेळी पाठीमागून रानडुक्कर अचानक अंगावर धावून आले.
रानडुकराला प्रतिकार करताना दात लागून मंगल पवार यांच्या दोन्ही हातांना खोलवर जखमा झाल्या. यानंतर रानडुकराने शेतातून धूम ठोकली. रानडुकराने आईवर हल्ला केल्याचे पाहून साक्षी रडू लागली. याबाबत तिने भावाला मोबाइलवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली.ग्रामस्थांनी जखमी पवार यांना रहिमतपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रानडुकराच्या दाताने पवार यांच्या दोन्ही हातांवर गंभीर जखमा झाल्याने एका हाताला अठरा व दुसऱ्या हाताला सात टाके पडले आहेत.घटनेचे गांभीर्य ओळखून रहिमतपूर येथील वनपाल अनिल देशमुख, वनरक्षक संतोष काळे व सूर्यकांत ठोंबरे यांच्यासह हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. जखमी मंगल पवार यांची व उपस्थित असलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारपूस केली. जखमी पवार यांना शासकीय नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्याबाबतच्या सूचना वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी वनपाल देशमुख यांना दिल्या आहे.