पाचगणी : कुडाळी नदीच्या पुरामध्ये वाहत जात असलेल्या महिलेला वाचविताना तिच्या अंगावर झाड पडल्याने ती गंभीर जखमी झाली. उपचारार्थ सोमर्डी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी रवींद्र पुजारी (वय ४७, रा. महू, ता. जावळी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबतची करहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, विजय आनंदराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मी रवींद्र पुजारी, या पती रवींद्र पुजारी व दीर संतोष पुजारी असे तिघेजण कुडाळी नदी शेजारी असणाऱ्या बन नावाच्या शिवारातून नदीकडेच्या पायवाटेने गव्हळ नावाच्या शिवारात निघाले होते. सध्या पावसाळी दिवस असल्याने नदीला पूर आला होता. पायवाटेने जात असताना लक्ष्मी यांचा पाय घसरुन नदीच्या पुराच्या प्रवाहात पडल्याने वाहू लागल्या.
फिर्यादी विजय व पती रवींद्र आणि दीर संतोष यांनी वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक प्रवाहाशेजारील करंजाचे झाड त्यांच्या अंगावर पडल्याने अधिकच जखमी झाल्या. त्यांना पाण्याबाहेर घेत त्वरित सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते. परंतु येथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले. करहर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार डी. जी. शिंदे व सहकारी अधिक तपास करीत आहेत.