सातारा : ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ न शकल्याने जम्बो कोविड हॉस्पिटलच्या दारातच ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून पडली आहे. अनेक कोरोना रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. बेड आणि ऑक्सिजन वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे दावे वारंवार करण्यात येत आहेत. पण मोठ्या प्रमाणात रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांचा जीव जाण्याच्या घटना घडण्यास सुरुवात झाली आहेत.
रविवारी अशीच एक धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली. वाई येथील ५७ वर्षीय महिलेला तब्बल ६ तास शहरात फिरूनही उपचार मिळू न शकल्याने जम्बो हॉस्पिटलच्या दारात अॅॅम्ब्युलन्समध्ये मृत्यू झाला. वृद्ध महिलेला त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलाने रविवारी सकाळी १० वाजता वाईतून साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात आणण्यात आले. त्यावेळी काहींनी जम्बोला बेड मिळेल असे सांगितल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना ११ वाजता जम्बो हॉस्पिटलला आणले.
यावेळी संबंधित डॉक्टरची कागदपत्र हे महिलेच्या मुलांनी जम्बोच्या रिसेप्शनजवळ दिले. त्यांनी मृत महिलेच्या मुलांना तुम्हाला बोलावतो, असे सांगितले. याचदरम्यान महिलेची ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली. त्यामुळे त्यांना तातडीने ऑक्सिजन बेड देऊन अॅडमिट करून घेण्याची विनंती मुलांनी रुग्णालय प्रशासनाला केली.
मात्र, त्या ठिकाणी ही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही, अशीच उत्तरे मिळाली.