वेळे : वाई तालुक्याच्या आकोशी येथील गंगुबाई पांडुरंग भणगे (वय ८०) यांचा शेतात होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गंगुबाई भणगे या रविवारी दुपारी घवली फाटा नावाच्या शिवारात गेल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी शेताच्या बांधावर वाढलेले गवत पेटवून दिले. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारणे केले. यावेळी अचानक गंगुबाई भणगे यांच्या साडीच्या पदराने पेट घेतला.
गंगुबाई यांनी ‘मला वाचवा मला वाचवा’ असा आरडाओरडा करताच परिसरातील सर्जेराव नामदेव शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पुष्पा बाळू भणगे यांना बोलावून गंगुबाई यांच्या साडीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ५० ते ६० टक्के भाजून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.