पाचगणी : दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील महिला रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
त्यांना उपचारार्थ वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वासंती अरुण कळंबे (वय ५०) असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, वासंती कळंबे या दांडेघर गावानजीक असलेल्या शेरबागजवळ ईशवार या शिवारात शनिवारी २९ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी कळपातून वेगळ्या झालेल्या एका रानडुकराने त्यांना जोरात धडक दिली. त्यामुळे त्या तेथेच पडल्या. या वेळी रानात जवळच असणाऱ्या सुशांत कळंबे यांनी हल्ल्याच्या आवाजाच्या दिशेने धावत जाऊन पाहिले असता वासंती या जखमी अवस्थेत खाली पडल्या होत्या. सुशांत यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना मुख्य रस्त्यावर आणले. तातडीने त्यांना पाचगणी येथील हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेले असता त्यांना पुढील उपचारासाठी वाई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, रानटी डुकराने हैदोस घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या पूर्व भागात रानडुकरांचा वावर वाढला आहे. रानडुकरांच्या सततच्या त्रासाने शेतकऱ्यांनी आपली शेती पडीक ठेवली आहे. आता तर गावाजळ येऊन नागरिकांवर हल्ला होत असेल तर वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.