रहिमतपूर : तारगाव-रहिमतपूर रस्त्याने भरधाव टेम्पोने गुजरवाडी हद्दीत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला उज्ज्वला यशवंत राऊत (वय ४० रा. किरोली, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, पळून चाललेल्या टेम्पोचालकाला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून पकडले. इस्माईल मोहम्मद मुल्ला (वय ५५), अल्ताफ इमाम कुरेशी (२४), सरफराज इमाम कुरेशी (२५ सर्व रा. कोरेगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, तारगाव-रहिमतपूर रस्त्यावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत गुरुवार, दि २९ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास भरधाव टेम्पोने (एमएच ११ बीएल ४४८०) दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकीचा (एमएच ११ सीए ५१४२) चालक गौरव यशवंत राऊत (वय २० रा. किरोली) हा गंभीर जखमी झाला. तर गाडीवर पाठीमागे बसलेली त्याची आई उज्ज्वला राऊत यांच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता भरधाव वेगाने वाहन चालवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक व स्थानिक लोकांच्या सहकार्याने रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी पथकासह तातडीने पाठलाग करून बोरगाव-रहिमतपूर दरम्यानच्या पुलावर अपघातग्रस्त टेम्पोला पकडले.वाहन चालकासह तिघांना संशयितांना पकडले. तपासादरम्यान टेम्पो चालकाने कऱ्हाड येथे जनावरे भरून कोरेगाव येथे निघाला होता. पोलिसांनी संशयितावर भरधाव वेगाने वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे व अपघात करून पळून जाण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अपघातग्रस्त टेम्पो रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी दिली. याबाबत मारुती गोविंद माने (रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कॉन्स्टेबल व्ही. एन. कापले तपास करत आहेत.