सातारा : पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून सुनीता तुकाराम ताटे (वय ३७, रा. तासगाव, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. ५ रोजी सकाळी अकरा वाजता तासगाव, ता. सातारा येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनीता ताटे यांच्या घरामध्ये सिमेंटच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या टाकीला गळती लागली होती. सिमेंटने ही गळती काढण्यात आली होती. दरम्यान, ५ मेरोजी सकाळी अकरा वाजता अचानक पाण्याची टाकी फुटली. त्यामुळे सिमेंटची भिंत खाली कोसळली. या भिंतीखाली सुनीता ताटे या दबल्या गेल्या. ही घटना घडली तेव्हा घरात त्यांचा पुतण्या होता. पुतण्याने सिमेंटची भिंत हटविण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, तो एकटा असल्याने त्याला भिंत हटविता आली नाही. त्यांचे घरही गावापासून लांब वस्तीवर असल्याने आजूबाजूचेही कोणी मदतीसाठी बोलवता आले नाही. परिणामी, सुनीता ताटे यांचा सिमेंटच्या भिंतीखाली बराचवेळ दबल्याने जागीच मृत्यू झाला.काही वेळानंतर गावातील लोक तेथे आले. त्यांनी भिंतीखालून सुनीता ताटे यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा अंत झाला होता. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार सचिन पिसाळ हे अधिक तपास करीत आहेत.
Satara: पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर कोसळल्याने महिला जागीच ठार
By दत्ता यादव | Published: May 06, 2024 7:17 PM