सातारा : महिला पोलिसांचा मोबाईल हिसकावून जबरी चोरीचा प्रयत्न करणार्या यल्ला ऊर्फ विराज अनिल कोळी (वय २०, रा. झोपडपट्टी सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी दुपारी रामनगर कॅनॉल परिसरात शिताफीने पकडले.
याबाबत माहिती अशी, महिला पोलीस अंमलदार सरोज शिंदे या दि. १९ रोजी ड्युटी संपवून घरी निघाल्या असताना शाहूपुरी जुनी ग्रामपंचायतीजवळ यल्ल्या कोळी या युवकाने त्यांचा मोबाईल व इतर साहित्य जबरीने हिसकावून पळून गेला होता. याप्रकरणी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. दि. २९ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना संशयित यल्ल्या कोळी रामनगर कॅनॉलवर फिरत असून, त्याने राखाडी रंगाचा शर्ट घातलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तत्काळ हालचाली करत रामनगर कॅनॉलवर जाऊन शोध घेत असताना कॅनॉल परिसरात यल्ल्या दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.