सातारा : महीनो महिने पालिकेच्या आरोग्य विभागाने शाहूपुरी परिसरातील कचरा न उचलल्याने महिलांनी आरोग्य विभागाला अक्षरशः धारेवर धरले. साठलेल्या कचऱ्यात अळ्या झाल्या आहेत, आता त्या आळ्यांचे फुलपाखरू होण्याची वाट बघताय का? असा खडा सवाल आक्रमक झालेल्या महिलांनी प्रशासनाला विचारला.पालिका प्रशासनाला निवेदन द्यायला आलेल्या महिलांनी निवेदन देण्याबरोबरच स्वच्छता प्रश्न प्रशासनाला धारेवर धरले. शाहूपुरी अंतर्गत असलेल्या कॉलनी, परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात अपुरा स्वच्छता कर्मचारी वर्ग कार्यरत असून याचा थेट परिणाम परिसरातील सार्वजनिक स्वच्छतेवर होत आहे.अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये रस्त्यालगत जागोजागी गवताचे प्रचंड साम्राज्य वाढले असून यामुळे वाढल्या जात असलेल्या डासांच्या प्रमाणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. मध्यतरी गवत छटाई मशिनद्वारे फक्त जास्त करून गणेश मंडळ परिसरातील गवत छटाई केली आहे. त्याचा इतरांना काय उपयोग? असा सवाल महिलांनी केला.
फवारणीचा नाही ताळमेळकोणत्याही प्रभागात सार्वजनिक कार्यक्रमाच्या आधी फवारणी करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असते. यंदा स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला कार्यक्रम झाल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पावडर फवारणी केल्याचा महिलांनी आरोप केला.
पालिकेने केले साफ दुर्लक्ष सातारा पालिका हद्दीत शाहूपुरी भागाचा समावेश झाल्यापासून या भागाकडे पालिकेने सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलांनी केला. ग्रामपंचायत असताना वेळच्यावेळी घंटागाडी येणे, स्वच्छता, पथदिव्यांची उत्तम व्यवस्था अशा सोयी होत्या. मात्र, पालिकेच्या गलथान कारभारामुळे या भागामध्ये राहणं ही मुश्किल वाटू लागल्याच्या भावना महिलांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्या.
जीपीएस अन् फोटोचे कौतुक नकोस्वच्छतेबाबत सातारा पालिका कायम आग्रही असून कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची केलेली कामे जीपीएस लोकेशन आणि फोटोसह पालिकेकडे रोजच्या रोज येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी महिलांना सांगितले. यावर आक्रमक महिलांनी जीपीएस आणि फोटोचे कौतुक आम्हाला नको आमच्या भागात स्वच्छता नाही हे वास्तव आहे. स्वच्छता महत्त्वाची आहे आणि आमच्या भागात ती झाली पाहिजे हेच आम्हाला समजते अशी भूमिका घेतली.