सातारा : निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला आत्ताशी सुरुवात झाली असली तरीही यंदाच्या निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागातील नेते मंडळींच्या घरात दिवसेंदिवस वाढता राबता असलेल्या कार्यकर्त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचे नियोजन करण्याचा ठेका महिला बचत गटांना मिळत असल्यामुळे या निवडणुकीत बचत गटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने यंदा फारच लवकर धुरळा उडवला आहे. सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्याबरोबरच भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत शड्डू ठोकल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे वेगळे सांगायला नको. मनोमिलनाच्या यशस्वी दशकानंतर दोन्ही आघाड्यांनी थाटलेली स्वतंत्र चूल यंदा अनेकांना रोजगार मिळवून देत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत डझनाहून अधिक बिनविरोध नगरसेवक झाल्याने कार्यकर्त्यांना जपणं आणि त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय करणं ही डोकेदुखी कोणालाच नव्हती. यावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे. शहराने बिनविरोध हटावचा नारा दिल्याने एकेका वॉर्डात परस्परांविरोधात उभे ठाकलेल्या उमेदवारांना प्रत्येक कार्यकर्ता आता महत्त्वाचा वाटू लागला आहे. म्हणूनच दिवसभर कार्यकर्त्यांच्या घोळक्यात राहणाऱ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना जेवायलाही घरी न सोडण्याचा जणू चंगच बांधला आहे. सकाळी नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत नेत्यांच्या पंगतीत बसूनच कार्यकर्ते फक्त झोपण्यासाठीच घरी जात असल्याचे चित्र विविध प्रभागांत पाहायला मिळत आहे. किरकोळ कार्यकर्त्यांचा वाढदिवस मात्र, ढाब्यांवर किंवा शहराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत जोरकसपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या धामधुमीतच निवडणुकीचे फटाके फुटल्याने यंदा महिला बचत गटांकडे तारांबळीचे चित्र दिसत आहे. दिवाळीच्या फराळाची आॅर्डर पूर्ण होतेना होते तोवरच निवडणूक प्रचारात असलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या आॅर्डर बचत गटांना मिळू लागल्या आहेत. घरातील महिलांना स्वयंपाकात गुंतवण्यापेक्षा त्यांचा उपयोगी सक्रिय प्रचारात करून घेऊन मतदानाची संख्या वाढविण्याची नीती उमेदवारांनी आखली आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांच्या घरी भल्या सकाळपासून नाष्टा आणि रात्री उशिरा जेवण पोहोचविणाऱ्या गाड्यांचा राबता आहे. निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्ते सकाळी सात वाजता येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी सात वाजता चहा आणि नाष्टा दिला की नंतर दुपारचे जेवण दुपारी दीड वाजता. चहा चार वाजता आणि रात्रीचे जेवण अकरानंतर असे नियोजन केल्याचे दिसते. (प्रतिनिधी) सीसीटीव्हीमुळे हॉटेल नकोच! गेल्या काही वर्षांत शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल आणि परिसरात मारामारीचे प्रमाण आटोक्यात आले आहे. मात्र, हेच सीसीटीव्ही आता नेत्यांची डोकेदुखी ठरत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्रास मतदार आणि कार्यकर्त्यांना विशिष्ट हॉटेलचे पास दिले की झालं!, असे होते. आता मात्र सीसीटीव्हीमुळे नेत्यांनी हॉटेलवर फुली मारून घरीच रोजच्या रोज शाकाहार आणि मांसाहाराच्या पंगती उठविण्यास सुरुवात केली आहे. प्रचाराच्या पुढील टप्प्यात मात्र मतदारांना त्यांच्या परिसरातील तरुणांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी प्रायोजकत्व देण्याचा मानस आहे. त्यामुळे हा खर्च आयोगाला दाखवण्याची डोकेदुखी असणार नाही, असे उमेदवारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जेवणावळींमुळे मिळतेय महिलांना रोजगाराची संधी
By admin | Published: November 09, 2016 1:22 AM