प्रगती जाधव-पाटीलसातारा : स्त्री-पुरूष समानतेचा नारा सर्वत्र घुमत असला तरीही बुद्धीच्या देवतेपुढे अजूनही पुरुषांचेच साम्राज्य असल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव मंडळांवर पुरुषांचे वर्चस्व इतके आहे की, मंडळात एकही महिला पदाधिकारी आढळून येत नाही. कौटुंबिक कारणांसह समजा व्यवस्थाही याला कारणीभूत आहे. त्यामुळे बाप्पांच्या मंडळात अजूनही तिची वर्णी लागणं अजूनही बरंच दूर असल्याचे गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.कुटुंबातील उत्सवाची तयारी आणि त्याचे नियोजन याची जबाबदारी अनेकदा घरातील महिलेकडे असते. प्राणप्रतिष्ठापना आणि मूर्ती विसर्जन या दोन्हीकडे पुरुषांना मान दिला जातो. पण, आरास करण्यापासून फराळ आणि नैवेद्य, येणारे जाणारे पाहुणे यांची जबाबदारी महिलांवर असते. परिणामी उत्सव काळात मंडळातील उत्सवाकडे दुर्लक्ष होईल असा पुरुषांचा समज आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांना पूर्जाअर्चा करण्याला मर्यादा असतात. त्यामुळे या काळात काही स्वतंत्र नियोजन करण्यापेक्षा महिलांना मंडळातून दूर ठेवण्याकडे कल दिसतो. विशेष म्हणजे मंडळांना नैवेद्य दुर्वा यासह रांगोळीच्या सेवेसाठी मात्र महिलांनाच आग्रहाने बोलावले जाते.
महिलांना या कारणासाठी दूर ठेवले जाते
- घरातील गणपतीच्या पूजाअर्चेत खंड पडू नये- मासिक पाळीत देवकार्य वर्ज्य असल्याने- कौटुंबिक व्यापातून वेळ काढता येत नाही- यातील फारशी आवड आणि हौस नसते- गल्लीतील कोणी काही चुकीचं वागलं तर- महिलांच्या एकीचा परिणाम- महिलांची मानसिकता दिसत नाही
सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ एकमेवचसाताऱ्यातील शनिवार पेठेतील सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाने चार वर्षांपूर्वी महिलांकडेच मंडळाची धुरा सोपविली होती. गणपती आगमन ते विसर्जन मिरवणूक सर्वांचे नियोजन महिलांकडे दिले होते. उत्सव काळात यशस्वी नियोजन करून या महिलांनी अनेकांचे कौतुक मिळविले. पण, पुढच्याच वर्षी त्यांच्यापैकी कोणीही नियोजनसाठी पुढे न आल्याने पुरुषांनी पुन्हा या मंडळाची जबाबदारी स्वीकारली.
लिंबू चमचा आणि रांगोळी स्पर्धा आता बास्सउत्सव काळात गणपती मंडळांनी महिलांना लिंबू चमचा, रांगोळी स्पर्धा, गौरी सजावट स्पर्धा एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले आहे. त्या पलीकडे महिलांच्या दृष्टीने या महोत्सवाकडे बघण्याचा विचारच मंडळांनी कधी केला नाही. उत्सव काळात महिलांची आरती, अथर्वशीर्ष पठण, होम मिनिस्टर, आदी खेळ घेऊन राजकीय हेतूने गर्दी आकर्षित करण्याचा उद्योग मंडळांकडून केला जात आहे. याला आळा घालायचा असेल तर मंडळांनी पर्यायी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत.
औपचारिकता नको... पात्रता असेल तर संधी द्या!
महिलांना संधी द्यायची म्हणून उगाचच त्यांना मंडळात एखाद्या पदावर घेण्यापेक्षा पुरुषांसारखेच त्यांची पात्रता तपासून मगच त्यांनाही संधी देण्याचा पायंडा पाडला पाहिजे. अनेकदा समाजाला दाखविण्यासाठी सक्तीने महिलांना घेतले जाते, पण या जबरदस्तीच्या अस्तित्वाने त्या मंडळाचे काहीच होत नाही. त्यामुळे महिला म्हणून संधी देण्यापेक्षा पात्रता पाहून संधी देण्याचा विचारही मंडळांनी करणे आवश्यक आहे.
महिलांकडे चार वर्षांपूर्वी मंडळाची धुरा सोपवली होती. त्यांनी उत्तम कामही केले. मात्र, पुढे संसारिक कारणे सांगून या महिलांनी मंडळाची जबाबदारी पुन्हा आमच्याकडेच सोपवली, पण एका वर्षात मंडळाने राबविलेले उपक्रम आणि त्याला मिळालेला प्रतिसाद अद्भुत असाच होता. आमच्या मंडळात अजूनही युवती आणि महिलांना संधी देण्याचा मानस आहे. - पांडुरंग पवार, अध्यक्ष सोन्या मारुती मंडळ, शनिवार पेठ.
गणेशोत्सव मंडळात युवतींना कोणी आरक्षण देईल अशी कोणीही प्रतीक्षा करू नये. नैसर्गिक पद्धतीने उत्सवात सहभागी होऊन येथेही समानता अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या युगातील युवती सक्षम आहेत. कोणाच्याही कुबड्यांशिवाय त्या त्यांच्या अधिकारासाठी लढण्याची धमक ठेवतात. त्यामुळे या उत्सवातही स्त्री-पुरूष भेद न ठेवणं अपेक्षित आहे. - ॲड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या.
महिलांच्या पुढाकाराने उत्सव साजरा करण्याचा अभिनव उपक्रम सोन्या मारुती मंडळाने राबवला होता. त्याचे अध्यक्षस्थान भूषविताना समाजातून होणाऱ्या बोचऱ्या टीकांनी मी त्रस्त झाले. बाप्पांची सेवा करताना महिला म्हणून होणारे आरोप मला रुचले नाहीत. त्यामुळे मी या पदातून मुक्त झाले, पण मंडळात काम करण्याचा अनुभव भन्नाट होता. - श्रद्धा सावंत, माजी अध्यक्ष.