सातारा : ‘ जिल्ह्याला परिवर्तनाची वैचारिक परंपरा आहे. महिलांच्या बाबतीत बाह्य स्वरूपातील परिवर्तन तातडीने होत असलं तरीही वैचारिक पातळीवरील परिवर्तन अद्यापही संथगतीने सुरू आहे. पुरुषांच्या क्षेत्रात महिला काम करतात. तो त्यांचा पराभव करण्यासाठी नव्हे, तर स्वत:चं अवकाश शोधण्याचा प्रयत्न असतो. एका यशस्वी पुरुषाच्या मागे जशी महिला असते तसेच यशस्वी महिलेच्या मागेही अनेक जण असतात, हे वास्तव आहे. ,’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
विविध क्षेत्रांत कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील २५ कर्तृत्ववान महिलांचा ‘लोकमत’च्या वतीने महाबळेश्वर येथील हॉटेल गौतममध्ये शनिवारी दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जाहिरात व्यवस्थापक राम जोशी, इव्हेंट हेड दीपक मनाठकर, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भाेगशेट्टी, मुख्य उपसंपादक दीपक शिंदे, जाहिरात उपव्यवस्थापक संतोष जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘महिलांचे आयकॉन होणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. त्याला सामाजिक उठावाची जोड मिळाल्याने महिलांचे कर्तृृत्व अधिक बहरत जाते. अशा पद्धतीने त्यांनी केलेल्या कामाचा गौरव होणं ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची घेतलेली दखल त्यांना मोठी भरारी मारण्यासाठी बळ देणारी ठरते.’
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘साताऱ्याला कर्तबगार, मातब्बरांचा इतिहास मोठा आहे. महिलांचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षाची श्रृंखलाही मोठी असते. कर्तबगार महिला वेचण्याचं कसब ‘लोकमत’ने उत्तम प्रकारे पार पाडले.’
आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘महिलांच्या कामाचा गौरव करण्यासाठी माझ्या मतदारसंघाची निवड ‘लोकमत’ने केल्याचा विशेष आनंद होतो. वैचारिक आणि कर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी हे यश मिळवलं, त्यांचा योग्य सन्मानही केला.’
प्रास्ताविकात संपादक वसंत भोसले म्हणाले, ‘असंख्य बातम्या देत असतानाच समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकणारे तारे शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने याद्वारे केला आहे. महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांबरोबरच मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. समीर देशपांडे आणि प्रगती जाधव-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी आभार मानले.
१३सातारा-लोकमत०१
महाबळेश्वर येथे शनिवारी ‘लोकमत’तर्फे प्रसिद्ध केलेल्या ‘वुमेन आयकॉन ऑफ सातारा’चे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आमदार मकरंद पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, संपादक वसंत भोसले उपस्थित होते. (छाया : जावेद खान)