खंडाळा : महिलांचे सबलीकरण होऊन त्यांना आर्थिक उन्नतीच्या मार्गावर सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले होते. ग्रामीण भागात गावागावात महिला बचतगट उभारले गेले. अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळाला. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी हे महिला बचत गट ग्रामसंघाच्या माध्यमातून एकत्रित येऊ लागले आहेत. त्यामुळे महिला बचतगट आर्थिक उन्नतीतून भरारी घेण्याच्या मार्गावर आहेत.
ग्रामीण भागातील महिलांचे संघटन आणि त्यातून बचतगट स्थापन झाले होते. याच माध्यमातून महिलांनी वीणकाम, शिवणकाम, कुटिरोद्योग, विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, मसाले उद्योग यासह वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करून त्यातून उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला होता. त्यामुळे खेडोपाड्यातील महिलांचे सबलीकरण होऊ लागले होते. या महिला बचतगटांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना चांगल्या बाजारपेठा मिळून आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी गावोगावचे बचतगट ग्रामसंघाच्या व्यासपीठावर एकत्र येत आहेत.
खंडाळा तालुक्यातील बावडा येथे भरारी ग्रामसंघाचा वर्धापन व संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, सरपंच गणेश पवार, उपसरपंच किशोर पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भोसले, उज्ज्वला खोमणे, अश्विनी धापते, तालुका व्यवस्थापक काशिनाथ कुंभार, प्रभाग समन्वयक रेश्मा धायगुडे, भरारी ग्राम संघाचे अध्यक्ष अमृता धापते, सचिव लता फडतरे, उषा पवार, सुमित मोरे, कृषी सखी अश्विनी धापते, ग्रामसेवक मल्हारी शेळके यासह प्रमुख उपस्थित होते. या निमित्ताने भरारी ग्रामसंघाच्या सदस्यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि शिवणकाम, विणकामचे स्टॉल लावले होते. त्यातून महिलांच्या कर्तृत्वाची प्रचिती समोर आली.
कोट..
ग्रामीण भागात बचतगट महिलांच्या सक्षमीकरणासाठी फलदायी ठरत आहेत. अनेक महिलांना रोजगाराचे मार्ग मिळाले आहेत. महिलांना प्रबळ करण्यासाठी राज्यकर्त्यांनी नेहमी सहकार्य केले आहे. त्यांना प्रोत्साहित करून नवीन उद्योग उभारणी करता यावी, यासाठी ग्रामसंघाची संकल्पना यशस्वी ठरेल.
-मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्य
...........................................
२३खंडाळा
फोटो मेल केला आहे.