कुडाळ : ‘महिलांनी आरोग्याप्रती सजग असणे काळाची गरज आहे. त्यांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करायला हवी. जावळी तालुका राष्ट्रवादी महिला आघाडी व ग्रामपंचायत, सरताळे यांच्या वतीने महिलांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले असून, त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सागर गायकवाड यांनी केले.
सरताळे, ता. जावळी येथे जावळी तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली भिसे व ग्रामपंचायत सरताळे यांच्या वतीने महिलांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच सुनील धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य निशांत नवले, रोशनी नवले, सारिका गुठाळे, सुचिता काळे, प्रकाश नवले, मंगेश नवले, धर्मजी यादव, प्रकाश गुठाळे, किसन मोरे, कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर, शालिनी देशमुख, सरताळे उपकेंद्राच्या डॉ. अन्नपूर्णा महाजन, शांताराम जाधव, शीतल जाधव, शिवाजी कचरे आदी उपस्थित होते.
कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. सागर गायकवाड व पुनम गायकवाड यांचा तसेच आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई, ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे सर्व निकष पाळून शिबिर घेण्यात आले. प्रारंभी उपस्थित सर्वांनाच निशांत नवले यांच्याकडून मास्कचे वाटप करण्यात आले. या शिबिरात सुमारे १२० महिलांची थायरॉईड, शुगर आदींची तपासणी करण्यात आली. यापुढेही अशा आरोग्यदायी उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असून, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत रुपाली भिसे यांनी मार्गदर्शन केले. निशांत नवले यांनी आभार मानले.